Home महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि. २५: दीपावली निमित्त राज्यभर प्रकाशपर्व साजरे होत असताना मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याने आज अनोखी दिवाळी अनुभवली. राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी साजरी केली. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला. आलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे औक्षण करीत त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. मुख्यमंत्र्यांच्या या आगळ्यावेगळ्या कृतीमुळे भारावून गेलेले शेतकरी बांधव वर्षातून बाहेर पडताना मुख्यमंत्र्यांनी बळीराजाची कदर केल्याची भावना व्यक्त करताना दिसून आले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करीत असल्याचे सांगतानाच नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. राज्य शासन तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

सर्वत्र दिवाळीचा उत्साह आणि धामधुम सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेले वर्षा निवासस्थान आज गजबजून गेले होते ते राज्यातून आलेल्या बळीराजाच्या आगमनाने…राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यातून प्रातिनिधीक स्वरुपात शेतकरी बांधव सपत्नीक या अनोख्या सोहळ्याला उपस्थित होते. पहिल्यांदाच अशा स्वरुपाची दिवाळी वर्षा येथे साजरी झाल्याचे अनेकांनी सांगितले.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गडचिरोली येथील दौरा आटोपून मुख्यमंत्री वर्षावर आले. त्यानंतर त्यांनी त्यांची पत्नी सौ. लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत, स्नुषा सौ. वृषाली यांनी प्रत्येक शेतकरी कुटुंबांचे जागेवर जाऊन औक्षण केले. त्यांना साडी- चोळी, धोतर आणि भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबिय आपले औक्षण करताय हे पाहून शेतकरी बांधव आणि त्यांचे कुटुंब हरखून गेले

होते.

या हृदय सोहळ्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. बळीराजा हा राज्याच्या विकासात महत्त्वाचा घटक असून त्याच्यासाठी आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यांमुळे बळीराजाला नैसर्गीक आपत्तीला तोंड द्यावे लागते. याप्रसंगी मी आपणा सर्वांना ग्वाही देतो की, तुम्ही धीर सोडू नका, खचू नका..आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची तातडीने अंमलबजावणी केली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत एकाच वेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यात आली. सेंद्रीय शेतीवर भर देतानाच विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांना मंजूरी देऊन लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आणि कृषि विकासासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

शेतकरी बांधवांनी पारंपारिक शेतीला आधुनिकतेचे बळ देऊन कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. बळीराजाला चांगले दिवस येवू दे अशी प्रार्थना करीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात दुधे दाम्पत्याला दिवाळी फराळ भरवला. वर्षावरील हिरवळीवर शेतकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रत्येक शेतकऱ्याची जातीने विचारपूस करीत होते. यावेळी अमरावतीच्या सौ. अर्चना सवाई आणि अहमदनगरचे सतीष कानवडे या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रास्ताविक केले. आमदार सर्वश्री प्रताप सरनाईक, प्रवीण दरेकर, माजी खासदार आनंद अडसुळ यांच्यासह सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, मदत व पुर्नवसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version