Home महाराष्ट्र बागेसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवावे – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

बागेसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवावे – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

0

मुंबई, दि. 2 : अंधेरी  पश्चिम येथील बागेसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवून परिसर सील करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  दिले.

अंधेरी पश्चिम येथील के. ईस्ट वॉर्ड येथे आज झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार अमित साटम, भारती लव्हेकर सर्व विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले की, बागेसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकामाबाबत माहिती घेऊन प्रशासनाने या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. लल्लूभाई पार्क, सूर्या हॉस्प‍िटल परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने स्थानिक पोलीसांनी तात्काळ कारवाई करावी. जोपर्यंत सुरक्षा रक्षक नियुक्त होत नाहीत, तोपर्यंत तिथे पोलीस स्टेशनने स्थानिक पोलीस सुरक्षेसाठी नेमावेत, असे निर्देश पालकमंत्री श्री.लोढा यांनी दिले.

नागरिकांनी विविध २३३ विषयांसंदर्भात आपले तक्रार अर्ज सादर केले. यामधील ८७ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून समस्या मांडल्या. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी https://mumbaisuburban.gov.in तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेसंदर्भात तक्रारीसाठी portal.mcgm.gov.in या लिंकवरही नागरिकांना तक्रार करता येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Exit mobile version