Home महाराष्ट्र निसर्गप्रेमींसाठी ‘जंगल है तो कल है’ प्रदर्शनाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते...

निसर्गप्रेमींसाठी ‘जंगल है तो कल है’ प्रदर्शनाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

0

मुंबई, दि. 22 : जागतिक वन, जल आणि हवामान दिनानिमित्त ‘जंगल है तो कल है’ संकल्पनेतून गेटवे ऑफ इंडिया येथे दोन दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयामार्फत वन आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिता सिंग आदी उपस्थित होते.

प्रदर्शनातून आभासी जंगल सफारी

वनसंपदेचे महत्त्व जाणून घेण्याच्या उद्देशाने ‘जंगल है तो कल है’ या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये वन, जल आणि हवामान या तीनही विषयांबाबतीत जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. प्रत्यक्षात आभासी वास्तविकता (व्हर्चुअल रियालिटी) च्या माध्यमातून वन आणि पर्यावरणाला भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण केली जात आहे. या आभासी प्रदर्शनात लोकांना प्रत्यक्ष जंगलामध्ये आल्याची अनुभूती होत आहे आणि जंगलात होणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या किंवा गतिविधि प्रत्यक्ष अनुभवू शकत आहेत.

या प्रदर्शनात माहितीपट डिस्प्लेसह महाराष्ट्र कांदळवन कक्ष उभारण्यात आले आहे.  महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, महाराष्ट्र बांबू बोर्ड यांच्या वतीने बांबूसंबंधी माहिती आणि कलाकृती, उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वन उत्पादनांवर आधारित अगरबत्ती प्रकल्प, मध इत्यादी सारखे वन उत्पादने प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.

दोन दिवसीय प्रदर्शन

हे प्रदर्शन आज मंगळवार दि. २१ मार्च रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत आणि बुधवार दि. २२ मार्च रोजी सकाळी ११ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत निसर्गप्रेमींसह सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात  मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version