Home महाराष्ट्र निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी ‘सीबा’ करार मैलाचा दगड ठरेल -मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी ‘सीबा’ करार मैलाचा दगड ठरेल -मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई, दि २3 : महाराष्ट्रामध्ये निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने तसेच  मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगार आणि उद्योग वाढीसाठी केलेला ‘सीबा’करार मैलाचा दगड ठरेल असा विश्वास वन, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

विधानभवन येथे मंगळवारी मत्स्य विभाग,महाराष्ट्र शासन आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर अँक्वाकल्चर (CIBA ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव अतुल पाटणे आणि सीबा चेन्नई चे संचालक कुलदीप कुमार, वैज्ञानिक पंकज पाटील हे उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशाला फार मोठा सागरी किनारा लाभला असून मच्छीमार बांधवांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रात विशेष करुन मत्स्यव्यवसाय मंत्रालय स्थापन केले आहे. केंद्र सरकारच्या आय.सी.ए.आर या सर्वोच्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर अँक्वाकल्चर सोबत करार झाल्याचा विशेष आनंद होत आहे. राज्यातील सातारा, सांगली, अकोला आणि अमरावती या भागातील खारपान पट्ट्यातील मत्स्यसंवर्धनाचे प्रश्नदेखील यामुळे सोडविण्यास मदत होणार आहे.

नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध प्रकारचे मत्स्यबीज निर्माण करणे, पालन, संसाधनांचा उपयोग करून घेणे यासाठी ही संस्था राज्याला मार्गदर्शन करणार आहे. मच्छीमार बांधवांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून या सरकारने डिझेल परतावा, जाळीचे अनुदान, मच्छी मार्केट अश्या अनेक विषयांवर सकारात्मक तोडगा काढला असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

केंद्र सरकारच्या मत्स्यसंपदा योजनेत निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन याकडे लक्ष वेधण्यात आले आहे असे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर अँक्वाकल्चरचे संचालक श्री. कुलदीप कुमार यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version