
आ.परिणय फुके यांच्यासह १२ सदस्यांचा समावेश…
मुंबई,दि.०१ आँगस्टः राज्य पोलीस विभागात रात्रंदिवस कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या, उपाय आणि मदतीसाठी राज्य शासनाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यस्तरीय समन्वय समिती गठित केली आहे. ही समन्वय समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय 31 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे.
राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी या राज्य स्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये फडणवीस यांचे खास समर्थक असलेले विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनाही स्थान मिळाले आहे.
गृहमंत्री श्री.फडणवीससह या समितीमध्ये १२ सदस्य असून त्यात कॅबिनेट मंत्री, आमदार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, गृहनिर्माण विभागाचे अधिकारी, पोलीस आयुक्त आदींचा समावेश आहे.
या राज्यस्तरीय पोलीस समन्वय समितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, सदस्य दीपक कैसरकर, मंत्री, शालेय शिक्षण, मंगलप्रसाद लोढा, कौशल्य विकास, उद्योजकता आणि नवोपक्रम, कालिदास कोळंबकर-विधानसभा सदस्य, राम कदम-विधानसभा सदस्य, डॉ. परिणय फुके-विधान परिषद सदस्य, सिद्धार्थ शिरोळे-विधानसभा सदस्य, अपर मुख्य सचिव, गृह, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, उपाध्यक्ष- प्रशासकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई, राहुल अर्जुनराव दुबळे, बीड यांचा समावेश आहे.