मुंबई, दि. ०३ : भारतात स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने आयटी, फिनटेक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. राज्य शासनाकडून स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून विविध योजनांमुळे तरुण उद्योजकांना मोठा आधार मिळत असल्याने नवउद्योजकांना उद्योगात उज्ज्वल भवितव्य आहे. आधुनिकतेचा स्वीकार करून ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर स्वीकारावा लागणार असल्याचा सूर ‘भारतीय उद्योजकतेचे भवितव्य-एक दृष्टिक्षेप’ चर्चासत्रातून उमटला.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेमध्ये ‘भारतीय उद्योजकतेचे भवितव्य-एक दृष्टिक्षेप’ चर्चासत्र पार पडले. चर्चासत्रात ‘बोट’ लाइफस्टाइलचे सहसंस्थापक अमन गुप्ता, शादी डॉट.कॉमचे अनुपम मित्तल यांनी भाग घेतला, उद्योजक श्री. खुराणा यांनी मुलाखत घेतली.
गुप्ता म्हणाले की, सध्या कोणताही छोटा मोठा व्यवसाय करा, त्यामध्ये ‘एआय’चा वापर हा राहणार आहे, यामुळे गुंतवणूकदारांनी अशा उद्योगात पैसे गुंतवायला हवेत. आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूकदारांसाठी काही समस्या असतात, मात्र व्यवसाय आणि पैसा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार हवेतच. पूर्वी शासकीय नोकरीला प्राधान्य होते, मात्र सध्या स्टार्टअपला प्राधान्य आहे. सुरुवातीला स्टार्टअपमध्ये काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. मात्र कधीतरी आपल्याला नफा मिळणार असल्याने कष्ट करण्याच्या मानसिकतेवर भर द्यायला हवा.
उद्योजक बनू लागले सेलिब्रिटी – गुप्ता
हिंदी आणि मराठी चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्री यांना आपण पूर्वी सेलिब्रिटी समजत होतो. सध्या स्टार्टअप आणि उद्योजकांचे युग आहे. उद्योजक हे नव्या पिढीचे सेलिब्रेटी बनत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. सध्या व्यवसायामध्ये महिलांचा वाढता सहभाग हा भारताच्या उद्योजकतेच्या विकासात सकारात्मक पाऊल आहे. सर्व क्षेत्रात महिला पुढे येत असून त्यांचा सहभाग वाढत आहे. महिला उद्योजकांसाठी विविध प्रशिक्षण व निधी शासकीय योजनातून मिळत आहे. मन, बुद्धी आणि वेळ दिला तर आपल्याला कोणत्याही क्षेत्रांमध्ये यश नक्की मिळते, असेही गुप्ता यांनी सांगितले.
‘एआय’मुळे रोजगार जाण्याची भीती नाही – मित्तल
मोबाईल आणि सोशल मीडिया वापरासह सर्व क्षेत्रामध्ये ‘एआय’चा वापर होणार आहे. ‘एआय’ वापराने रोजगार जाण्याची भीती नाही, मात्र त्याचा सकारात्मक पद्धतीने स्वीकार करून आपल्या व्यवसायात वापर करायला हवा. विकसित भारताच्या जीडीपीमध्ये नवउद्योजकांचा खूप मोठा वाटा असेल, असे शादी डॉट कॉमचे श्री. मित्तल यांनी सांगितले.
चॅट जीपीटी, गो टू चाही वापर वाढत आहे. कोणत्याही टेक्स्टबाबत सर्व उपलब्ध माहिती मिळते. ॲप बनवायला सोपे असल्याने यामध्येही रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. चांगली जागा/क्षेत्र (Area) निवडा. चांगल्या कल्पनांची अंमलबजावणी करण्याची क्षमता असेल तर चांगले उद्योजक बनाल. काहीतरी बदल घडवण्यासाठी किंवा समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने उद्योगाची सुरुवात करा, महिलांनी उद्योग करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढे यायला हवे, असेही मित्तल यांनी यावेळी सांगितले.