‘डाटा ड्राइवेन इनसाईट अँड मेजरमेंट इन ॲडव्हर्टायझिंग’ परिसंवाद
मुंबई, दि. ४ : डिजिटल माध्यमातून प्रचार प्रसिद्धीसाठी योग्य डेटा (माहिती) असणे आवश्यक असून जाहिरात प्रकियेत डेटा केंद्रबिंदू आहे. कोणत्याही प्रसिद्धी मोहिमेसाठी अचूक डेटा असणे महत्त्वाचे आहे. अचूक डेटा मिळविण्यासाठी शोध घेणे, योग्य नियोजन, योजना आणि मूल्यमापन आवश्यक आहे, असे ग्रुप एम साऊथ एशियाचे मुख्य धोरण अधिकारी एम. ए. पार्थसारथी यांनी सांगितले.
जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘डाटा ड्राइवेन इनसाईट अँड मेजरमेंट इन ऍडव्हर्टायझिंग’ या विषयावर श्री. पार्थसारथी बोलत होते.
श्री. पार्थसारथी म्हणाले, सामजिक संशोधनातून माहिती संग्रहित करताना नमुना निवड पद्धती, जनगणना, सर्वेक्षण, संभाव्यतेवर आधारित, निश्चित माहिती, निवडक ग्राहकांवर आधारित माहिती घेणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे विविध डिजिटल माध्यमातून योग्य घटकांपर्यंत पोहोचणे सहज सोपे होते.
डेटाचा उपयोग आज केवळ माहिती मिळवण्यासाठी नाही, तर संपूर्ण जाहिरात प्रक्रियेचा शोध, नियोजन, अंमलबजावणी, आणि मोजमाप या सर्व टप्प्यांमध्ये केला जातो. सध्या शासकीय, खासगी क्षेत्रात जाहिरातीचे महत्व वाढले आहे. वयोगट, लिंग, आवडीनिवडी, ऑनलाइन वर्तन यावर आधारित जाहिरातीसाठी माहिती गोळा करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकासाठी डेटा गोळा करताना त्यांची स्पष्ट संमती आणि खात्री अत्यंत आवश्यक आहे, असेही श्री. पार्थसारथी यांनी सांगितले.
अचूक माहिती संकलित करणे गरजेचे
ग्राहक स्वतःहून वेगवेगळ्या ब्रँडला डेटा देतो. पण त्यांची संमती आवश्यक आहे. यात खरेदीची योजना, वैयक्तिक माहिती, आवडीनिवडी आणि संवादाचे माध्यम निवडण्यासारख्या बाबींचा समावेश होतो. ग्राहकांच्या थेट संवादातून माहिती संकलित केली जाते, दुसऱ्या कंपनीकडून डेटा विकत घेतला जातो. याची अचूक माहिती संकलित केली जाते.