छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास डोळे दिपवणाऱ्या संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

0
34
संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात
प्रधानमंत्री यांच्या हस्ते होईल उद्घाटन
नवी दिल्ली, दि.7: छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास डोळे दिपवणाऱ्या संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर उभा करण्यात येत आहे. या संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात असून या संग्रहालयाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती समितीचे महासचिव कर्नल मोहन काक्तीकर (सेवानिवृत्त), मिलिंद पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी गार्डियन मीडिया आणि इंटरटेनमेंट चे संचालक संजय दाबके हे ही उपस्थित होते. श्री दाबके यांच्या माध्यमातून अत्याधुनिक अद्यावत असे संग्रहालय मूर्त रूपात उभे राहत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समिती ही दिल्लीतील इन्स्टिट्यूशनल एरिया कुतुब एन्क्लेव्ह या ठिकाणी आहे. या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. या ठिकाणी जागतिक दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक संग्रहालय राजधानी दिल्लीत असावे असा मानस समितीचा होता. त्याप्रमाणे वर्ष 2020 पासून यावर काम सुरू आहे. अशी माहिती, श्री काक्तीकर यांनी यावेळी दिली.
उत्तर भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचवावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संग्रहालय उभारण्यात येत असल्याची माहिती श्री काक्तीकर यांनी यावेळी दिली.
हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने तयार करण्यात आलेले आहे. पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यात हे संग्रहालय असणार आहे.
या संग्रहालयातील वस्तू या ऐतिहासिक दस्ताऐवजांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या आहेत. संग्राहालय पाहताना महाराजाच्या काळात आपण आहोत असा आभास निर्माण करण्यात आलेला आहे. संग्रहालयातील काही भागांमध्ये 13 डी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आहे.
यासह डार्क राईडच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांना पाहता येईल. हे देशातील एक अभूतपूर्व असे संग्रहालय असणार आहे.
0000