चौकुळ – जांभळ्याचे कोंड येथील पाणवठ्यात पट्टेरी वाघाचे दर्शन

0
17

सावंतवाडी:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ येथील जांभळ्याचे कोंड नदीतील एका पाणवठ्यात पट्टेरी वाघ पाण्यात डुंबताना आणि खडकावर बसून पाणी पिताना निदर्शनास आला आहे. तेथील स्थानिक युवकांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. अनेक जणांनी हे फोटो आणि व्हिडिओ आपल्या स्टेट्सला ठेवल्याने ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

स्थानिकांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, काही युवकांना हा वाघ पाण्यात दिसला असता त्यांनी तात्काळ आपल्या मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले, अशी माहिती दिली.वनविभागाला तात्काळ याबाबत माहिती देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी भेट देऊन नोंद घेतली आहे. वाघाने कोणतीही हानी पोहोचवलेली नसली तरी ग्रामस्थांमध्ये भीती आणि आश्चर्याचे वातावरण आहे.दरम्यान याबाबत वनविभागाच्या आंबोली वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या परिसरात पट्टेरी वाघांचे अस्तित्व असल्याचे मान्य केले.