कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात राज्यात कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय दुसऱ्या क्रमांकावर

0
16
कोल्हापूर, दि. 23 : राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला असून, यामध्ये सर्वोकृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालमयांमधून कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयास व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. यामध्ये लातूर जिल्हा माहिती कार्यालय प्रथम तर तृतीय क्रमांकावर सातारा व परभणी कार्यालय आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील सर्व शासकीय कार्यालयांनी विविध सुधारणांचा अवलंब केला. त्यांनी वेळोवेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीस भेट देत, 100 दिवसांच्या सुधारणा मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली. यामध्ये सुलभ जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, ई-ऑफीस प्रणाली, आर्थिक व औद्योगिक गुंतवणूक प्रोत्साहन, कृत्रिम बुद्धिमत्ता, तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा समावेश होता.
उपसंचालक (माहिती) प्रविण टाके यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर विभागातील सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील माहिती कार्यालयांनी मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला. या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाने विभागातून प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय अंतिम तपासणीस पात्र ठरले होते. वेळोवेळी या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावरून संचालक, उपसंचालक यांनीसुद्धा व्हीसीद्वारे मार्गदर्शन केले.
भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत समितीने अंतिम तपासणी करताना कार्यालयातील स्वच्छता, पत्रकारांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा, शासकीय योजनांची प्रसिद्धी, सामाजिक माध्यमांचा वापर, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अशा विविध बाबींचा सविस्तर आढावा घेतला. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयातील अभिलेख कक्ष, कोल्हापूर पर्यटन पुस्तिका, तक्रार निवारण प्रसिद्धी, सौर ऊर्जेचा वापर, कार्यालयीन स्वच्छता, नामफलक, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर, कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच अभ्यागत भेटीच्या व्यवस्था आदी विषयांवर विशेष काम झाले असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी सांगितले. या यशाबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा माहिती कार्यालयाचे विशेष अभिनंदन केले असून, उपसंचालक प्रविण टाके यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामधील विविध 42 जिल्हास्तरावरील कार्यालयांमध्ये एकमेव जिल्हा माहिती कार्यालय कोल्हापूरचा समावेश निवड झालेल्या कार्यालयांमध्ये झाला आहे.