
पुणे, दि. १८ जून, २०२५ : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पंढरपूराकडे प्रस्थान ठेवले. आणि अवघी देहूनगरी विठ्ठलनामाने दुमदूमली. यंदा वारीत सुमारे 3 लाखाहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.
देहूनगरी सध्या तुकोबामय झाली आहे. ज्ञानोबा-तुकाराम चा गजर करीत हरिभक्तांची मांदियाळीने देहूतून पंढरपूरसाठी प्रस्थान केले.
“पंढरीस जाय। तो विसरे बापमाय ॥ अवघा होय पांडुरंग। राहे धरूनियां अंग ॥
न लगे धन मान। देह भावे उदासीन ॥ तुका म्हणे मळ। नाशी तत्काळ ते स्थळ ॥”
पहाटे पाच वाजता श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख हभप दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, विश्वस्त उमेश महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे आणि लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा व आरती झाली.
पहाटे 5.30 वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर या ठिकाणी पूजा व आरती करण्यात आली. सकाळी 9 ते 11 श्री तुकोबारायांच्या पादुकांची पूजा इनामदारसाहेब वाड्यात करण्यात आली. त्यानंतर परंपरेनुसार संस्थानच्या वतीने या पादुका डोईवर घेऊन मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. सकाळी 10 ते 12 या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा सप्ताहाची सांगता झाली.
दुपारी अडीच वाजता प्रमुख मान्यवर व महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी भाविक भक्तांच्या हस्ते संत तुकोबांच्या पादुकांना महाभिषेक घालून महापूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ झाला.
प्रमुख दिंड्याच्या उपस्थितीत आणि वारकरी भाविक भक्तांसह हरिनामाच्या गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात पालखीने मंदिर प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिरातून प्रस्थान पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. सायंकाळी पालखी प्रस्थान सोहळा श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदारसाहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसावला. त्या ठिकाणी आरती होऊन रात्री देहूकर महाराजांचे कीर्तन, हरिनामाचा जागर असे धार्मिक कार्यक्रम झाले.