Home महाराष्ट्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून औरादशहाजनीतील बॅरेजची पाहणी

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून औरादशहाजनीतील बॅरेजची पाहणी

0

लातूर, दि. 25 :- जलसंपदा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील औरादशहाजानी (ता.निलंगा) येथील तेरणा नदीवरील कोल्हापूरी बंधाऱ्याच्या बॅरेजमध्ये रुपांतरण करण्यात आलेल्या कामाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.  यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंचनक्षमता, पाणी पुरवठा योजना, वृक्ष लागवड यांचाही संबंधीत यंत्रणांकडून आढावा घेतला.या बॅरेजमुळे औरादशहाजानी विश्रामगृहालगत विहंगम परिसर निर्माण झाला आहे.याठिकाणाहूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी बॅरेजची पाहणी केली.
यावेळी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार डॅा. सुनील गायकवाड, मुख्यमंत्री कार्यालयातील अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त डॅा. पुरूषोत्तम भापकर,  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत,मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, जिल्हा पोलीस अधीक्षक शिवाजीराव राठोड, उपविभागीय अधिकारी भवानजी आगे तसेच विविध विभागांचे प्रमुख,अंमलबजावणी यंत्रणांतील अधिकारी आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. पाटील-निलंगेकर यांनी कोल्हापुरी बंधारा आणि बॅरेजच्या रुपांतरणाच्या कामाबाबत माहिती दिली. या कामांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधानही व्यक्त केले.यावेळी जलसंपदा विभाग औरंगाबादचे मुख्य अभियंता ए. पी. कोहीरकर, निम्न तेरणा कालवा विभाग लातूरचे कार्यकारी अभियंता आय. एम. चिस्ती, उपअभियंता बी. आर. वाडीकर, एस. डी. खंदारे, सहायक अभियंता अमोल सुर्यवंशी यांनी बॅरेजच्या वैशिष्ट्‌यांची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबादचे अधीक्षक अभियंता ए. डी. कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती.

Exit mobile version