Home महाराष्ट्र सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘बीच सॅक धोरण’ राबविणार- राज्यमंत्री मदन येरावार

सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘बीच सॅक धोरण’ राबविणार- राज्यमंत्री मदन येरावार

0

मुंबई, दि. 19 : गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी बीच सॅक धोरण राबविणार असल्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज येथे सांगितले.राज्यात बीच सॅक धोरण तयार करण्याबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. येरावार म्हणाले की, पर्यटकांना सागरी किनाऱ्यावर राहण्याचा आनंद घेण्याची मनस्वी इच्छा असते. बीच सॅक, हट्स,अंब्रेला इत्यादी सुविधा गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अशा सुविधेला पर्यटकांचा प्रतिसाद मिळत असून त्यातूनस्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. तारकर्ली,
शिरोडा-वेळागर, मुरुड-दापोली, गणपतीपुळे, अलिबाग, दिवे-आगार,आक्षी-नागांव, केळवा, बोर्डी इ. ठिकाणी विस्तीर्ण समुद्र किनारे आहेत. या ठिकाणी पर्यटकांना बीच सॅक, हट्स, अंब्रेला अशा सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता धोरण ठरविण्यासाठी नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग,महाराष्ट्र सागरी किनारा नियंत्रण (MCZMA), महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड,आरोग्य विभाग, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषधी विभाग या विभागांची समिती स्थापन करुन धोरण ठरविले जाईल, असे श्री. येरावार यांनी यावेळी सांगितले.
बीच सॅक-बीच सॅक म्हणजे समुद्र किनारी तात्पुरत्या स्वरुपात बांबूच्या सहाय्याने तयार केलेली झोपडी होय. यामध्ये किचन, फर्निचर,टॉयलेट, फायर कव्हर, फर्स्ट एड (Fire cover/First Aid) इ. सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. बीच सॅक सुविधा ही 1 सप्टेंबर ते 31 मे या कालावधीत पर्यटकांकरीता उपलब्ध करुन देण्यात येते.

Exit mobile version