Home महाराष्ट्र विविध पाणीपुरवठा प्रकल्पांचे होणार ई-भूमिपूजन

विविध पाणीपुरवठा प्रकल्पांचे होणार ई-भूमिपूजन

0

मुंबई दि.9:- मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जलस्वराज्य टप्पा प्रकल्पातून राज्याच्या विविध भागांत मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना, पाणी तपासणी प्रयोगशाळा, स्वयंचलित हवामान केंद्र, टंचाईग्रस्त गावांसाठी साठवण टाक्‍या उभारणीचे प्रकल्प, पाणी गुणवत्ताबाधित गावांसाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र उभारणीचे प्रकल्प अशा विविध पाणीपुरवठाविषयक प्रकल्पांचे येत्या सोमवारी, 10 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकाच वेळी ई-भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिली.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा कार्यक्रम होणार असून, यावेळी तंत्रज्ञानाच्या आधारे एकाच वेळी राज्याच्या विविध भागांत काम सुरू होणाऱ्या पाणीपुरवठा प्रकल्पांचे ई-भूमिपूजन करण्यात येईल. सोमवारी, 10 जुलै रोजी दुपारी हा कार्यक्रम होणार असून त्याचे www.mahapani.in या संकेतस्थळावरून थेट वेब प्रक्षेपणही करण्यात येणार आहे, अशी माहिती लोणीकर यांनी दिली. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या उंबर्डा बाजार, वनोजा, वारला, जऊळका, म्हसनी, चिंचांबाभर, भामदेवी, दुबळवेल, चांडस, करडा (सर्व जि. वाशिम), पराडा (जि. जालना), पुतळी (जि. गोंदीया), तळोधी बाळापूर (जि. चंद्रपूर) या पाणीपुरवठा योजनांचे यावेळी ई-भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच जलस्वराज्य कार्यक्रमातून मंजूर करण्यात आलेल्या रेठरे बुद्रुक, गोळेश्वर (दोन्ही जि. सातारा), शिरसगाव (जि. नगर), कुंभिवली (जि. रायगड), एकार्जुना, नांदगाव जानी, आवारपूर (तिन्ही जि. चंद्रपूर), सगरोळी, अर्जापूर (दोन्ही जि. नांदेड), वाघोदे (जि. जळगाव) या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना ई-भूमिपूजनानंतर सुरवात होणार आहे. याशिवाय शहापाडा (जि. रायगड) येथे एमएमआरडीए अर्थसाहाय्यीत पाणीपुरवठा योजनेचेही यावेळी ई-भूमिपूजन केले जाणार आहे.

जिल्ह्यांमध्ये पाणी तपासणी प्रयोगशाळा
ग्रामीण जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाण्याची गुणवत्ता तपासणाऱ्या प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात अशा पाणी तपासणी प्रयोगशाळांच्या बांधकामाचे ई-भूमिपूजन केले जाईल. या टप्प्यात सातारा, जळगाव, अहमदनगर, हिंगोली, लातूर,परभणी, सांगली, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, जालना, सोलापूर, नंदूरबार व गडचिरोली येथील पाणी तपासणी प्रयोगशाळांच्या बांधकामाचा शुभारंभ केला जाणार आहे.

Exit mobile version