Home महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी-मुख्यमंत्री फडणवीस

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांनी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी-मुख्यमंत्री फडणवीस

0

मुंबई,दि.29: राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच आपल्या कामातील दर्जा व कार्यक्षमता वाढविण्यासाठीही त्याचा उपयोग करावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
राज्याच्या पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मल्ल्‍िाक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे आयुक्त दत्ता पडसलगीकर आदी यावेळी उपस्थित होते. पोलीस दलाच्या दक्षता मासिकाच्या गणेशोत्सव व स्वातंत्र्यदिन विशेषांकाचे तसेच मासिकाच्या फेसबुक पेजचे अनावरणही यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री
श्री. फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर थेट संवाद साधून माहिती जाणून घेतली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडत आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात यावा. राज्यातील अनेक अधिकाऱ्यांकडे नवनवीन कल्पना आहेत. या कल्पना एकत्रित करून त्याचा वापर आपल्या कामामध्ये करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. राज्यात गुन्हे व गुन्हेगारी माग काढण्‍यासाठी अन्वेषण यंत्रणा व प्रणाली (सीसीटीएनएस) हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती जमा झाली आहे. या माहितीचे विश्लेषण करून त्याचा वापर दैनंदिन कामामध्ये वाढविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.तसेच गुन्ह्याची तक्रार (एफआयआर) डिजिटल स्वरुपात घ्यावी. तसेच मोबाईलवरून नागरिकांना तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यासाठी यंत्रणा उभी करावीत. तसेच हा डाटा साठविण्यासाठी क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करावा. राज्यात अद्ययावत फॉरेन्सिक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत.पुढील काळात या प्रयोगशाळांचा उपयोग करून गुन्ह्यांच्या उकल व
सिद्धतेसाठी जास्तीत जास्त फॉरेन्सिक पुरावे वापरण्याचे उद्दिष्ट ठेवावे,असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
गृहराज्यमंत्री श्री. केसरकर म्हणाले, कार्यक्षमता वाढविण्यासाठी पोलीसांच्या गरजा पूर्ण करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. त्यातून पोलीसांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पोलीस
गृहनिर्माण विभागाबरोबरच इतर शासकीय गृहनिर्माण संस्था व खासगी विकसकाकडून चांगल्या दर्जाची घरे खरेदीसाठी कर्मचाऱ्यांना सहाय्य करण्यात येत आहे. पोलीसांनी भू माफियांविरुद्ध कडक कारवाई करावी. तसेच उकल न झालेल्या गुन्ह्यांमध्ये बक्षिस जाहीर केल्यास फायदा होईल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात ग्राम सुरक्षा दल स्थापण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी पुढाकार घ्यावा. पोलीस पाटलांची भरती पोलीस विभागामार्फत करून त्यांचे वेतन वाढविण्यासंदर्भात शासनस्तरावर विचार करण्यात येईल.
गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील म्हणाले, सर्वसामान्यांबरोबर थेट संबंध असणारा विभाग म्हणून पोलीसांकडे पाहिले जाते. त्यामुळे प्रत्येक पोलिसांनी जनतेबरोबर संवाद साधण्यावर भर द्यावा. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी पोलिस दलातील शेवटच्या घटकातील कर्मचाऱ्यांनी स्वंयस्फूर्तीने पुढाकार घ्यावा.यावेळी पोलीस महासंचालक श्री. माथूर व मुंबईचे पोलीस आयुक्त श्री.
पडसलगीकर यांनी सादरीकरण केले.

Exit mobile version