Home महाराष्ट्र पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट-डाॅ.सूर्यवंशी

पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट-डाॅ.सूर्यवंशी

0

रायगड(अलिबाग),दि.15-  राज्यात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत असून रायगड  जिल्ह्यात फलोत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वाव असल्याने इतर कुठल्या प्रजातीचे झाडे लावण्यापेक्षा यावर्षी पाच हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन फळबागाचे वृक्ष लागवड करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी डाॅ.विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे.त्यासंबधी त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकित कृषी विभागाला तशा सुचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया फलोत्पादन अभियान व फळबाग लागवड योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात गटशेतीसाठी एक कोटी रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य देण्याची व गटशेतीस प्रोत्साहन व चालना देण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली असल्याचे नमूद करून त्यानुसार यंदा जिल्ह्यात सेंद्रिय भात, सेंद्रिय भाजीपाला, निर्यातक्षम आंबा व प्रक्रिया याबाबत गटशेतीचे प्रस्ताव प्रत्येक तालुक्यातून सादर करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, कृषी क्षेत्रातील योगदान असलेले शेतकरी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, रोहयो उपजिल्हाधिकारी पी. एस. जैतू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग सिगेदार, आत्मा प्रकल्प संचालक मंगेश डावरे, तसेच कृषी, आत्मा, वनविभाग, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, दुग्धविकास व जलसंधारण विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, प्रगतशील शेतकरी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादन कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Exit mobile version