Home महाराष्ट्र कर्जमाफीचे गावनिहाय अर्ज आपले सरकार पोर्टलवर; 2 ऑक्टोबरपर्यंत चावडी वाचन

कर्जमाफीचे गावनिहाय अर्ज आपले सरकार पोर्टलवर; 2 ऑक्टोबरपर्यंत चावडी वाचन

0
मुंबई ,दि.30- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी सरकारच्या आपले सरकार या पोर्टलवर जाहीर करण्यात आली असून २ ऑक्टोबरपर्यंत चावडी वाचन पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्जमाफीसाठी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. चावडीवाचनासाठी जिल्हास्तरीय यंत्रणेकडून संपूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बैठकीत दिली.
बँकांकडून कर्जमाफीच्या अर्जांची संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाने त्याची तपासणी करावी. तपासणी पूर्ण झाल्यानंतर ज्या जिल्ह्यांतील सर्व बँकांची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येईल, अशी चर्चाही बैठकीत झाली. राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी, २८ बँकांनी त्यांची माहिती (डेटा) माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून तपासून मंजूरी घेतली आहे. तर १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी बँंक स्तरावर ५० टक्क्यांपेक्षा जास्त माहिती भरली आहे.त्या माहितीचे लेखापरीक्षण सुरू आहे. व्यापारी बँकांमध्ये एकूण ४३ पैकी २० बँकांनी त्यांची माहिती (डेटा) तपासणीसाठी माहिती तंत्रज्ञान विभागाकडे सादर केली आहे. त्यापैकी आठ बँकांंच्या माहितीची तपासणी करून मंजुरी देण्यात आली आहे. तर २८ बँकांंनी त्यांच्या स्तरावर ५० टक्क्यांपेक्षा जास्त माहिती भरलेली आहे. उर्वरित बँकांची माहिती तपासणीसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत. बँकेकडील माहिती अपलोड झाल्यानंतर संगणकीय संस्करण सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थींच्या प्रारुप याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी या वेळी दिली.

Exit mobile version