Home महाराष्ट्र 35 टक्के मुलांची फुफ्फुसे प्रदूषणामुळे कमजोर

35 टक्के मुलांची फुफ्फुसे प्रदूषणामुळे कमजोर

0

मुंबई – देशातील 35 टक्के मुलांची फुफ्फुसे कमजोर असल्याचे एका पाहणीत आढळले आहे. हवेच्या प्रदूषणाला वेळीच आळा न घातल्यास हा आजार बळावण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हवेतील प्रदूषणाच्या वाढणाऱ्या पातळीमुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे याआधीच उघड झाले आहे. पण, त्याचा सर्वाधिक फटका शालेय वयातील मुलांना बसत आहे. ब्रेथ ब्ल्यू या संस्थेने केलेल्या पाहणीत हे दिसून आले आहे.

या संस्थेने मुंबई, कोलकता, बंगळूर, दिल्ली या भागांतील शालेय मुलांची पाहणी केली. देशभरातील सुमारे दोन हजार मुलांची तपासणी करण्यात आली. त्या वेळी मुंबईतील 13 टक्के, बंगळूरतील 14 टक्के, कोलकतातील नऊ टक्के आणि दिल्लीमधील 21 टक्के मुलांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी असल्याचे दिसून आले. उघड्या वाहनांतून प्रवास करणाऱ्या मुलांमध्ये फुप्फुसांचे आजार जास्त आढळले.

फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे श्‍वसनाशी निगडित आजार होण्याची शक्‍यता वाढते, असे लीलावती रुग्णालयाच्या छाती विकार विभागाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव मेहता यांनी सांगितले. देशातील वाढते प्रदूषण ही मोठी समस्या असून, त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढणार आहे. या बाबीचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसतो. शरीराच्या वाढीच्या काळातच अशा तऱ्हेने आजाराशी सामना करण्याची वेळ आल्याने त्यांचे अवयव अशा धोक्‍यांशी लढू शकत नाहीत, असे “हिल फाउंडेशन‘च्या डॉ. प्रीतिश कौल यांनी सांगितले.

Exit mobile version