कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शाळा-कॉलेज बंद

0
485

मुंबई,दि.14 :राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागाने आरोग्य विभागाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस टाळण्यासाठी गर्दी टाळा असा सल्ला दिला जात आहे. पण सर्वाधिक गर्दी होणारे ठिकाण म्हणजे शाळा आहेत. येथे होणारी गर्दी ही चिमुकल्यांची आहे. विद्यार्थी हा सर्वात जास्त समूहाच्या संपर्कात येतो. समूहामुळे कोरोनाचा संसर्ग जास्त वाढू शकतो अशी भीती असल्याने राज्य सरकारने खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र, यादरम्यान दहावीची परीक्षा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर, देशातील विविध राज्यांनीही कोरोनाचा धोका लक्षात घेऊन शाळा, महाविद्यालये आणि थिएटर  31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली सरकारने शाळा, महाविद्यालये आणि सर्व थिएटर्स 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तर  गोवा सरकारकडूनही रविवारी मध्यरात्रीपासून सर्व शैक्षणिक संस्था, जिम, स्विमिंग पूल, सिनेमा थिएटर, कॅसिनो इत्यादी 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, चीनमधील कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.