मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.22ः – महाराष्ट्रात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाइलाजाने राज्यात नाइलाजाने कलम 144 लागू केली जात आहे. केवळ मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड नव्हे तर सर्वच नागरी भागांमध्ये ही संचारबंदी लागू राहील. मध्यरात्रीपासून कुणीही दुसऱ्या देशातून आपल्या देशात येणार नाही. परदेशी फ्लाइटला देशात उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे, विनाकरण गर्दी करू नका. टोळक्यांमध्ये फिरू नका. 31 मार्च पर्यंत राज्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. यापुढे गरज पडल्यास आणखी त्यामध्ये वाढ करण्यात येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. यात जीवनावश्यक सेवा आणि वस्तूंना सूट दिली जाणार आहे.
या सेवा बंद होणार नाहीत
कलम 144 लागू असतानाही राज्यात जीवनावश्यक सेवा सुरूच राहतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे विनाकारण वस्तूंचा साठा करण्यासाठी दुकानांवर गर्दी करू नका. दैनंदिन वस्तूंची दुकाने, अन्न-धान्याची दुकाने, भाजीपाला विक्रेते, वीज पुरवठा कार्यालये आणि बँकिंग तसेच आर्थिक व्यवहार करणारी कार्यालये यापुढे सुद्धा सुरूच राहतील. तरीही ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे. त्यांनी घरातून काम करण्याचा पर्याय निवडावा. ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे त्यांनी घरातूनच काम करावे. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. सर्वांनी सहकार्य करा. या व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपल्याला किमान 31 मार्च पर्यंत ही बंदी लागू राहील. पुढे विचार करून आवश्यकता वाटल्यास त्यात वाढ केली जाईल असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 5 टक्क्यांवर आणली
मुख्यमंत्र्यांनी वर्क फ्रॉम होमचे आवाहन करत असताना सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा 5 टक्क्यांवर आली आहे अशी माहिती दिली. सुरुवातीला गरजेनुसार, सरकारी कार्यालयांमध्ये सुरुवातीला 50 टक्के कर्मचाऱ्यांवर सरकारी कामकाज सोपवण्यात आले होते. आता वर्क फ्रॉम होमची गरज लक्षात घेता, सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 25 टक्के आणि त्यानंतर आता 5 टक्के करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या महत्वपूर्ण घोषणा
रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद
जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील
अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील
शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील
आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत
ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत, अशांनी कृपा करून 15 दिवस घराबाहेर पडू नका
चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत, 31 मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल
सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद
अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती