औरंगाबाद, दि.24 मार्च- शहरीकरण, वृक्षतोड यामुळे कायम नजरेसमोर असणारी चिमणी आता दिसेनाशी झाली आहे. चिमण्यांची संख्या कमी झाल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर काळजी व्यक्त करण्यात आली आणि त्यातूनच 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास प्रारंभ झाला. याचाच एक भाग म्हणून निसर्गप्रेमी औरंगाबाद समूहातर्फे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणारे कार्यक्रमदेखील राबविण्यात येत आहेत. यांमध्ये मातीच्या भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे, चिमण्यांना घरटे करण्यासाठी घराजवळ घरातील टाकाऊ वस्तूपासून घरटे तयार करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण कशी करता येईल याबाबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे.
निसर्गाच्या जतन संवर्धनासाठी उत्साही तरुणांचा औरंगाबाद निसर्गप्रेमी समूह जिल्ह्यात कार्यरत असून या समूहामार्फत ना नफा ना तोटा या तत्वावर पक्ष्यांना धान्य ठेवण्यासाठी बर्ड फिडर उपलब्ध करण्यात आले आहेत असे श्री आशिष दापके यांनी सांगितले, सदरील बर्ड फिडर निस्वार्थ भावनेने बरेच नागरीक आपल्या अंगणात ठेवत आहेत. घरोघरी नागरिकात विशेष करून शालेय मुलांमध्ये यामुळे पशु पक्ष्याबद्दल आवड व प्रेम निर्माण होत आहे.
याकामी श्री आशिष दापके, श्री विकास बनकर, श्री अनिल शिरसे, श्री मोहित पांडे, श्री सुरेश साळवे, श्री. दिगंबर राठोड, श्री. गोरख जाधव, श्री.अंकुश रावते, कु. शगुण खंडेलवाल, सौ. प्रणिता दापके हे परिश्रम घेत आहेत.