नपचा निधी वर्ग केला तसे स्वच्छता व पथदिव्याचे कामही बांधकाम विभागाकडे वर्ग करा
धाराशिव शहरवासियांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना काळे मास्क लावून निवेदन
धाराशिव, दि.9-पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या दबावाखाली जिल्हाधिकारी काम करत असल्याचा आरोप करत शहरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्र्यांवर बेशरमीची फुले उधळून आम्ही स्वागत करु असा इशारा धाराशिव शहरवासियांच्या वतीने देण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.८) जिल्हाधिकाऱ्यांना शहरातील नागरी समस्यांबाबत काळे मास्क लावून निवेदन देण्यात आले. ज्या तत्परतेने पालकमंत्री व सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली नगर पालिकेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला, त्याच तत्परतेने शहरातील स्वच्छता, पथदिब्यांबाबतही तत्परता दाखवून ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करुन शहर रोगराईमुक्त करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, माजी नगरसेवकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, धाराशिव शहरामध्ये नगरपरिषदेच्या माध्यमातून शहर स्वच्छतेचे काम करण्यात येते. मात्र गेल्या वर्षभरापासून शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सहा-सहा महिने नाल्यांची सफाई केली जात नसल्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात शहरात कोविडसदृश्य अशी परिस्थिती निर्माण झाली होती. डेंग्यूसदृश रुग्ण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासंदर्भात विविध राजकीय पक्षांनी, नागरिकांनी आपल्याला अनेकवेळा निवेदने दिली, परंतु आपण त्यांच्या निवेदनाची दखल न घेता या निवेदनांना केराची टोपली दाखवली. गौरी गणपती, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या दिवसांतही धाराशिव शहरातील जवळपास ३० ते ४० टक्के पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारात चाचपडत चालण्याची वेळ आली. या संदर्भात विविध राजकीय पक्ष व नागरिकांनी निवेदन देऊन, आंदोलने करून गैरसोय दूर करण्याची विनंती केली तरीही त्याची आपण दखल घेतली नाही किंवा तत्परता दाखवली नाही.
धाराशिव शहरातील विविध कामांना १५ ते २० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. त्याची निविदा प्रक्रिया झालेली असताना ती निविदा प्रक्रिया पूर्ण करून शहरातील रस्ते व नाल्या करून नागरिकांची होणारी हेळसांड थांबवून निविदा प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून कामे सुरू करावीत व कार्यान्वित यंत्रणा बदलण्यात येऊ नये, अशा विषयाचे निवेदन शहरवासियांनी दि. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी आपणास देण्यात आले होते. याबाबत मला अधिकार नाहीत, मी फफक्त प्रशासकीय मंजुरी देतो, ही सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे, असे आम्हाला सांगितले. त्याच दिवशी तुम्ही पालकमंत्री महोदय व सत्ताधारी आमदार यांच्या दबावाखाली नगर पालिकेला आदेश काढून आपण स्वतः मार्च २०२३ रोजी शहरातील विविध कामांना मिळालेल्या प्रशासकीय मंजुरीमध्ये आपण त्यात नमूद केले होते की, १० लाखांच्या आतील कामे ई- निविदा करणे बंधनकारक, राहील, तसे न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी यांची राहील, असे नमूद केले असता जिल्हाधिकारी कार्यालय आदेशित करता की, १० लाखांच्या आतील सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावे. व कार्यान्वित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग ही राहील, असे आदेशित केले. पालकमंत्री व सत्ताधार आमदार यांच्या दबावामुळे १० लाखांच्या आतील कामांच्या शिफारसी रातोरात वाटल्या. याबाबत पालकमंत्री व सत्ताधारी आमदारांच्या आदेशाची आपण किती कार्यतत्परता दाखवली, हे यावरून दिसून येते.
आपण पालकमंत्र्यांच्या दबावामुळे व सत्ताधारी आमदाराच्या दबावामुळे जेवढी कार्यतत्परता दाखवली अशीच कार्यतत्परता मागील एक वर्षापासून विविध राजकीय पक्ष व नागरिक शहर स्वच्छतेबाबत आपल्याला निवेदने, फोटो व व्हिडीओ पाठवतात, मात्र त्याबाबत आपण कार्यतत्परता का दाखवली नाही. नागरिकांच्या निवेदनाची दखल घेऊन शहर स्वच्छतेचे कामकाज तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून का घेतले नाही तसेच शहरातील ३० ते ४० टक्के बंद असलेल्या पथदिव्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून नागरिकांची होणारी हेळसांड का थांबवली नाही किंवा कार्यतत्परता का दाखवली नाही.
तरी आमची आपल्याला विनंती आहे की नगरपालिकेच्या माध्यमातून धाराशिव शहरातील स्वच्छतेचे आणि पथदिव्यांचे कामकाज तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावे. व शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, नालेसफफाई व बंद असलेले पथदिवे सुरू करून शहरातील होणार नागरिकांची हेळसांड थांबवावी. विविध राजकीय पक्ष, नागरिक यांनी वेळोवेळी आपणास शहर स्वच्छतेबाबत व बंद पथदिव्याबाबत निवेदने दिली, आंदोलने केली, परंतु त्यांच्या या मागणीला दाद दिली नाही. परंतु आपण रातोरात पालकमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करून आपणच अटी, शर्ती व नियम घालून दिलेले असताना आपलेच नियम तुम्ही रद्द करता. जिल्हाधिकारी हे शासन व नागरिक यांच्यातील दुवा असतात. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की, आमच्या मागणीची दखल घ्यावी व शहराच्या बाबतीतही आपण अशीच तत्परता शहर स्वच्छता व बंद पथदिव्यांबाबत दाखवून हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून शहर रोगराईमुक्त व स्वच्छ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अमित शिंदे, सोमनाथ गुरव, खलील सय्यद, खलिफा कुरेशी, मेहबूब पटेल, सचिन पवार, आयाज शेख, इस्माईल शेख, बाबा मुजावर, गणेश खोचरे, तुषार निंबाळकर, कादर खान, राणा बनसोडे, प्रशांत पाटील,अग्निवेश शिंदे, उमेश राजे, अभिषेक बागल, पंकज पाटील, साबेर सय्यद, बिलाल तांबोळी, एजाज काझी, मुजीब काझी, सुनील वाघ, अविनाश जाधव, योगेश सोन्ने पाटील, जयंत देशमुख, बाळासाहेब वरुडकर, विनायक कदम, मारुती बोंदर, अब्दुल रजाक, युसुफ पठाण, शिवप्रतापसिंह कोळी, अजित बाकले, सुरज देवगिरे, राकेश कचरे, प्रवीण केसकर, नियामत मोमीन, दत्तात्रय घुटे, प्रदीप घुटे, देवानंद एडके, बिलाल तांबोळी, जाकेर पठाण, अशोक बनसोडे, पृथ्वीराज देडे, मुकेश शिंदे, अन्वर शेख, शिवयोगी चपने, सतीश लोंढे, सुनील वाघ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.