दिशा समितीच्या बैठकीत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा सर्वंकष आढावा

0
10
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
· खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सूचना
·
लातूर, दि. ०६: केंद्र शासनाच्या निधीतून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य, शैक्षणिक, कृषी विषयक व दळणवळण यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना खासदार डॉ. शिवाजी काळगे व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक खासदार डॉ. काळगे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार श्री. राजेनिंबाळकर सहअध्यक्षतेखाली झाली. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव, समितीच्या अशासकीय सदस्य जयश्री उटगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात आयुष हॉस्पिटल सुरु करण्यासाठी, तसेच आणखी एक केंद्रीय विद्यालय सुरु करण्याबाबत दिशा समितीच्या शिफारसीसह विहित मार्गाने प्रस्ताव सादर करावा. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण, मध्यान्ह भोजन उपलब्ध होण्यासाठी वेळोवेळी आढावा घेण्यात यावा, असे खासदार डॉ. काळगे म्हणाले. तसेच जिल्ह्यात केंद्रीय निधीतून सुरु असलेल्या सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार होतील, याची खबरदारी घ्यावी. सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना द्यावा, सिंचन सुविधांचे बळकटकरण करावे, असे त्यांनी सांगितले.
लातूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अमृत २.० अभियानातून करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करावे. तसेच भूमिगत गटार योजनेचे काम दर्जेदार होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे खासदार डॉ. काळगे म्हणाले.
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध होतील, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे. तसेच बियाणे खरेदी करताना कोणकोणत्या बाबी तपासाव्यात, काय काळजी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. फळबाग लागवड हा शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणारा पर्याय आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी प्रयत्न करावेत. गावोगावी होणाऱ्या शेती शाळांमध्ये याबाबत माहिती द्यावी, असे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेची शाळा ही ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा स्त्रोत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे अनेक विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेत चमकत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत चांगल्या शैक्षणिक सुविधा, गणवेश, मध्यान्ह भोजन उपलब्ध करून द्यावे. हे काम स्थानिक स्तरावर महिला बचतगटांच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न करावा, असे श्री. राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
गतवर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपनीकडून विमा दावे मंजूर करताना दुजाभाव करण्यात आला आहे. याबाबत अनेक तक्रारी असून या तक्रारींचा निपटारा लवकरात लवकर केला जावा. जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही करून ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिल्या. शासनाच्या निधीचा योग्य वापर होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करावे, असे त्यांनी सांगितले.
लातूर शहराला स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने नुकतीच धरण ते जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली आहे. त्यानुसार आवश्यक बाबींवर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन केली आहे. तसेच जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या.
प्रारंभी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. शोषखड्डा भरा अभियानाच्या माहिती पुस्तिकेचे यावेळी उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ अभियानाचा शुभेच्छा संदेश उपस्थित लोकप्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला.