नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम तातडीने अदा करावी– पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
18
परभणी, दि.7: मागील दोन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या परभणी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिकविमा योजनेतंर्गत नुकसान भरपाईचा निधी अद्याप मिळाला नाही, त्यांना हा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. संबंधित विमा कंपनीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यास दिरंगाई करु नये, अशी सूचनाही त्यांनी केली.
सन 2023-24 व 2024-25 या वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळाली नाही, या अनुषंगाने आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर व आमदार राहूल पाटील हे दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी श्री. कुलकर्णी, आयसीआयसीआय लोंम्बार्ड कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
सन 2023-24 व 2024-25 या वर्षातील प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत नैसर्गिक आपत्तीचा निधी परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्री यांनी या विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. आज सदर विषयाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना पिकविमा पोटी राज्य शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे, ज्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही, त्यांना तात्काळ मदत देण्याची कार्यवाही केली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करु नये. संबधित विमा कंपनी व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी पिकविम्याचा निधी शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करावा. याबाबत कुठल्याही प्रकारे दिरंगाई करु नये.
यावेळी आमदार श्री. विटेकर, श्री. गुट्टे, श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांना नसैगिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानपोटी पिकविम्याची रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी केली.
प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी 2023-24 स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 24,651 शेतकऱ्यांना रु. 37.73 कोटी निधी मंजूर झाला. यापैकी 24,587 शेतकऱ्यांना रु. 37.65 कोटी निधी वाटप करण्यात आला.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2024-25 हवामानातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 6,73,000 शेतकऱ्यांसाठी रु. 299.23 कोटी निधी मंजूर झाला. यापैकी 6,70,217 शेतकऱ्यांना रु. 298.75 कोटी निधी वाटप करण्यात आला. तर 2,783 शेतकऱ्यांना निधी वाटपाची प्रक्रीया सुरु आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2024-25 स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 50,270 शेतकऱ्यांना रु. 104.77 कोटी निधी मंजूर झाला. यापैकी 50,247 शेतकऱ्यांना रु. 104.73 कोटी निधी वाटप करण्यात आला. तर 23 शेतकऱ्यांना निधी वाटपाची प्रक्रीया सुरु आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2024-25 काढणी पश्चात अंतर्गत 9,317 शेतकऱ्यांसाठी रु. 24.18 कोटी निधी मंजूर असून शासनस्तरावरुन हा निधी प्राप्त झाल्यानंतर त्याचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.
*-*-*-*-*