
धाराशिव, दि.२० मे – संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान २.० अंतर्गत जिल्ह्यातील निवडक गावांची पाहणी करण्यासाठी विभागीय तपासणी समिती आज जिल्हयात आली होती.या समितीने जिल्ह्यातील दोन गावांना भेटी दिल्या.
विभागीय तपासणी समितीमध्ये सहायक आयुक्त (विकास) तथा सदस्य सचिव उद्धव होळकर, सहायक आयुक्त (विकास) / आस्थापना दिलीप गुमरे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांचे प्रतिनिधी वसंत पोतदार, संचालक माहिती व जनसंपर्क विभागीय कार्यालयाचे प्रतिनिधी नंदु पवार,स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी हनुमंत गादगे, आदींनी पाहणी केली.
उमरगा तालुक्यातील औराद व भूम तालुक्यातील घाटनांदूर या गावांना भेट दिली.ग्रामस्वच्छतेच्या अनुषंगाने गावांची प्रगती,स्वच्छता उपाययोजना व ग्रामस्थांचा सहभाग याची समितीने पाहणी केली.
समितीमध्ये महसूल,आरोग्य, पाणीपुरवठा,पंचायत राज आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी सहभागी होते.समितीने गावांतील सार्वजनिक शौचालये, गटारी व्यवस्थापन,कचर्याची विलगीकरण व्यवस्था,जलसंवर्धन, हरितभिंती, भिंती चित्रण,वस्ती स्वच्छता इत्यादी बाबींचा आढावा घेतला.
औराद गावात ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावातील ओला-सुका कचरा वेगवेगळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था पाहण्यात आली.तसेच, लोकसहभागातून सुरू असलेल्या स्वच्छता मोहीमेमुळे गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व अंगणवाडी परिसर स्वच्छ आढळले.
घाटनांदूर गावातही स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कार्य दिसून आले.ग्रामस्थांनी घराघरातून कचरा संकलन,जलसंवर्धनासाठी बांधलेली पाणी टाकी व गटारींची स्वच्छता नियमितपणे केली जात जातेय का याची पाहणी केली.
पाहणी दरम्यान समितीने गावकऱ्यांशी स्वच्छतेबाबत संवाद साधला.गावकऱ्यांनी देखील सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचा योग्य लाभ घेत गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या पाहणीमुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २.० अंतर्गत गावांनी स्वच्छतेच्या दिशेने घेतलेली पावले आणि लोकसहभागातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा अधोरेखित झाली.विभागीय समिती पाहणी अहवाल शासनाकडे सादर करणार असून,उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना जिल्हास्तरावर गौरवण्यात येणार आहे.
यावेळी औरादचे सरपंच सुशील जाधव,उपसरपंच रमेश कारभारी, ग्रामसेवक एस.पी.नंदरगे,घाटनांदुरचे सरपंच रावसाहेब बंदवान,उपसरपंच खेलदेव बेरगळ,ग्रामसेवक एस.जी. नागटिळक यांच्यासह औरद व घाटनांदुर गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.