
वृत्तसंस्था
नवी दिल्ली-आयकर विभागाने आज कर बुडविणार्या लोकांची नावे प्रसिद्ध करण्याचे नवे धोरण अवलंबिले आहे. सर्वाधिक कर चुकवेगिरी केलेल्या १८ कंपन्याची यादी आयकर विभागाने आज जाहीर केली. या कंपन्यांनी सुमारे ५०० कोटी रुपयांचा कर भरलेला नाही. सामान्य नागरिक करबुडव्यांबाबतची माहिती देण्यासाठी मदत करू शकतील, अशी आशा आयकर विभागाला वाटते.
यासंदर्भात एका वरिष्ठ आयकर अधिकार्याने सांगितले की, ही नावे आयकर विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आज मंगळवारी आयकर विभागाने पहिल्यांदाच एक यादी प्रसिद्ध करून करचुकवेगिरी करणार्या कंपन्यांची नावे, त्यांचे आयकर विभागाकडे असलेले पत्ते आणि पॅन नंबर जाहीर केले आहेत. सुरुवातीला आयकर विभागाने १८ जणांची नावे प्रसिद्ध केली होती.
या यादीत जयपूरच्या गोल्डसुख ट्रेड इंडिया कंपनीने सर्वाधिक कर चुकवेगिरी केली आहे. या कंपनीने ७५.४७ कोटी रुपयांचा कर भरलेला नाही. सोमानी सिमेंट कंपनीने २७.४७ कोटी, ब्ल्यू इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ७५.११ कोटी, ऍपलटेक सोल्युशन कंपनीने २७.०७ कोटी, ज्युपिटर बिझनेस कंपनीने २१.३१ कोटी आणि हिरक बायोटेक कंपनीने १८.५४ कोटी रुपयांचा कर थकित केला आहे. एकूण १८ जणांच्या यादीतील ११ जण हे गुजरात स्थित आहेत. कर बुडविणार्यांना तातडीने थकलेला कर जमा करण्याबाबत नोटिसही देण्यात आली आहे.