संचारबंदीनंतर मुरबाड तालुुक्यात गावबंदीची मोहीम

0
181

मुरबाड,दि.24: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी व जिल्हाबंदी केली असली तरी, या ही पुढे जाऊन दक्षता म्हणुन मुरबाड तालुक्यातील गावांनी स्वतः पुढे येत ‘गावबंदी’ मोहीम घेतली आहे. कोणत्याही बाहेरील अनोळखी व्यक्तीस गावात येऊ द्यायचे नाही, व गावातील व्यक्तीस बाहेर जाऊ द्यायचे नाही, असे अनेक गावांनी निर्णय घेतले आहेत, यासाठी गावोगावचे तरुण गाववेशीवर जागता पहारा देत आहेत.कोरोनावर मात करण्यासाठी गर्दी टाळण्याचे सर्व प्रयत्न सुरू असतांनाही शहरी भागातील रहिवासी बेफिकीरपणे वागताना दिसत आहेत.अनेक ठिकाणी हूल्लडबाज आणि बेशिस्तांना आवरण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.मात्र आजाराचे संकट मुरबाड तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या लक्षात आल्याने सोमवारी रात्री अनेक गावांनी बैठका घेऊन ‘गावबंदी’चे निर्णय घेतले.

रातोरात तरुण वर्गाने गावांच्या रस्त्यांवर लाकडांनी प्रवेशद्वारे बनवून पहारा देण्यास सुरुवात केली आहे.गावातील व्यक्तीला महत्वाचे काम असेल तरच बाहेर जाऊ देणे, अनोळखी व्यक्तीला गावात प्रवेश नं देणे यासाठी गावांनी कंबर कसली आहे.तालुक्यातील किशोर, वांजळे, वाघीवली, करवेळे , धानीवली,  ब्राह्मणगाव, टेमगाव, भुवनपाडा, असोसे, हिरेघर,  कळमखांडे अशा अनेक गावांनी ही खबरदारी घेतली आहे.आपला बचाव आपणच करू शकतो, अजूनही गावखेडी निरोगी आहेत.बाहेरून येणाऱ्यांपासून धोका आहे.काल फार्महाऊसवर आलेल्या एका इसमास गावकऱ्यांनी पिटाळले, त्याच्या हातावर होम क्वारांटाईनचा शिक्का होता.