Home राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा

साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा

0

 

नवी दिल्ली, 19  : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची सर्वोच्च  मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. तसेच, सोनाली नवांगुळ यांना मराठीतील अनुवादासाठी आणि डॉ.मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेतील अनुवादासाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत व देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने शनिवारी मानाच्या फेलोशिपची व वर्ष 2020च्या अनुवाद पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत फेलोशिप पुरस्कारांसाठी 7 साहित्यिकांची तर 24 भाषांतील अनुवाद  पुरस्कारांची  निवड करण्यात आली.

भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची मानाची फेलोशिप

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांना मराठी भाषेतील साहित्यिक योगदानासाठी साहित्य अकादमीची फेलो‍शिप जाहीर झाली आहे. मराठीसह बंगाली, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, संस्कृत आणि तामीळ भाषेतील योगदानासाठी  साहित्यिकांनाही मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

 

भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी, कथा संग्रह आणि समिक्षात्मक अशी एकूण 15 पुस्तके प्रकाशित आहेत. श्री. नेमाडे यांनी लंडन स्थित ‘स्कुल ऑफ ओरियंटल अँड आफ्रीकनस्टडीज’ सह विविध विद्यापीठांमध्ये इंग्रजी, मराठी आणि तौलानिक साहित्याविषयी अध्यापनकार्य केले आहे. महाराष्ट्रातील लघु मासिकांच्या चळवळीतील अध्वर्युपैकी ते एक आहेत. साहित्यिक योगदानासाठी त्यांना केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, ह. ना. आपटे पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आदी मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलानिक साहित्यिक अध्यासनाचे प्रमुख म्हणून श्री. नेमाडे निवृत्त झाले. सध्या ते गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागांतर्गत सोहिरोबनाथ अंबिये अध्यासनाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

Exit mobile version