Home राष्ट्रीय देश सात हजार आयटीआय एका वर्षात उघडणार

सात हजार आयटीआय एका वर्षात उघडणार

0

नवी दिल्ली – देशात सात हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय आगामी एक वर्षाच्या काळात उघडण्याच्या सूचना कौशल्य विकास मंत्रालयाला पंतप्रधान कार्यालयाने दिल्या आहेत. देशात गेल्या साठ वर्षात १३,१०५ हजार आयटीआय कार्यरत असून पंतप्रधान कार्यालयाचा आता एका वर्षात पुन्हा सात हजार आयटीआय उघडण्याचा संकल्प आहे.

१८.६० लाख विद्यार्थी सध्या या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊन कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. त्या उद्योगांना कुशल मनुष्य बळाची गरज भासणार असल्याची बाब ध्यानात घेऊन आणखी आयटीआय उघडण्यात येणार आहेत.

डिसेंबर २०१५च्या शेवटच्या आठवड्यात कौशल्य विकास मंत्रालयातील अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयातील अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात आगामी काळात लागणार्‍या कुशल मनुष्य बळाच्या गरजेवर विचार केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ७ हजार नव्या आयटीआयची गरज असल्याचे सांगितले. हा आकडा मोठा असल्याचे कौशल्य विकास मंत्रालयाच्या अधिकार्‍याने सूचित केले असले तरी पंतप्रधान कार्यालयाने सांगितल्यामुळे त्यांना वेगाने काम करावे लागणार आहे. त्यासाठी कौशल्य विकास मंत्रालय नावीन्यपूर्ण कल्पनांवर विचार करीत आहे.

या मंत्रालयाला गेल्या वर्षी अर्थसंकल्पातून दीड हजार कोटी रुपये मिळाले होते. मात्र, ते प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमासाठी देण्यात आले होते. त्या आधारे विविध क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या कामाच्या जागेवर प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचा रियल ईस्टेटसारख्या बर्‍याच क्षेत्रांना चांगला लाभ झाला आहे. मात्र, उत्पादन क्षेत्राला आयटीआयच्या माध्यमातूनच चांगले प्रशिक्षणार्थी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे, असे पंतप्रधान कार्यालयाला वाटते. त्याचबरोबर ज्या भागात मोठे उद्योग आहेत त्यांना तेथे असलेल्या आयटीआयमध्ये आणखी सुधारणा करण्यास सांगण्याचाही सरकारचा विचार आहे.

Exit mobile version