दिल्ली– दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सदिच्छा भेट घेतली. आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना विठोबा – रखुमाईची मूर्ती भेट म्हणून दिली. त्यांच्या या दौऱ्यात महाराष्ट्रातील राजकीय घटनाक्रमावरही धीर गंभीर चर्चा झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी दिल्ली दौऱ्यावर गेलेत. त्यांच्या या 2 दिवसांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही विशेष भेट घेणार आहेत.
राष्ट्रपतींशी केली चर्चा
शनिवारी सकाळी राष्ट्रपती भवनातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी कोविंद यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठोबा रखुमाईची सुंदर अशी मूर्ती भेट देण्यात आली. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली.

अमित शहांनी दिल्या शुभेच्छा

शुक्रवारी रात्री विमानतळावरून महाराष्ट्र सदन येथे पोहोचल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निवासस्थान गाठले. या बैठकीत खातेवाटपाविषयी चर्चा झाल्याचे समजते. अमित शहांनी या भेटीचे छायाचित्र शेअर करत ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. मला विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दोघे जनतेची निष्ठापूर्वक सेवा कराल आणि महाराष्ट्राला विकासाच्या नवीन उंचीवर घेऊन जाल.