Home राष्ट्रीय देश उत्तरप्रदेशात भाजपाची ‘हाफ सेंच्युरी’

उत्तरप्रदेशात भाजपाची ‘हाफ सेंच्युरी’

0

लखनऊ, दि. 11 – उत्तरप्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिला कल मायावतींच्या बहुजन समाजवादी पक्षाला मिळाला. पण त्यानंतर भाजपाने उत्तरप्रदेशात आघाडी घेतली आहे. उत्तरप्रदेशात भाजपा 30 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असून समाजवादी पक्ष 18 आणि मायावतींची बसपा 9 जागांवर आघाडीवर आहे. सकाळी पोस्टल मतांची मोजणी सुरु झाल्यानंतर मऊमधून बसपाचे बाहुबली उमेदवार मुक्तार अन्सारी आघाडीवर होते.
बहुतांश एक्झिट पोल्सनी आणि सट्टा बाजाराने उत्तरप्रदेशात भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. उत्तरप्रदेश देशातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशचा निकाल देशातील सद्य राजकीय समीकरणे बदलू शकतो तसेच दोन वर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही हा निकाल महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपाने उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी आपली पूर्ण ताकत पणाला लावली आहे. एक्झिट पोल्सचा अंदाज खरा ठरला तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पक्षातील स्थान अधिक बळकट होईल आणि निकाल विरोधात गेल्यास भाजपाला प्रादेशिक पक्षांबरोबर सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल.
उत्तरप्रदेशचे राजकारण जवळून पाहणा-या राजकीय विश्लेषकांना या राज्यांत कोणालाच बहुमत मिळणार नाही, असेच वाटत आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आमच्या आघाडीलाच बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. भाजपाला रोखण्यासाठी प्रसंगी आम्ही मायावती यांची मदत घ्यायचा विचार करू, असे अखिलेश यांनी म्हटले असले तरी बसपाने आपली भूमिका जाहीर केलेली आहे. अखिलेश यांच्या वरील वक्तव्यातून सपाला बहुमत मिळणार नाही, हेच स्पष्ट होते, असे भाजपाने म्हटले आहे.

Exit mobile version