महिलांमधील गुणांचा मानसन्मान करा : राष्ट्रपतींचे आवाहन

0
18

वृत्तसंस्था
नवी दिल्ली-देशात महिलांचा मानसन्मान राखण्यासाठी त्यांच्यावर अन्याय-अत्याचार होणार नाहीत याची काळजी प्रत्येक भारतीयाने घ्यावी, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून केले.
आपल्या मुलाकडूनच जर आई सुरक्षित नसेल तर ती बाब प्रत्येक भारतीयासाठी क्लेषदायक असल्याचे सांगत राष्ट्रपती पुढे म्हणाले की, हे टाळण्यासाठी देशवासीयांनी महिलांमधील गुणांचा मानसन्मान केला तर त्या एक जागतिक शक्ती झाल्याशिवाय राहणार नाही.
महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतण्याची शतकपूर्ती यावर्षी आपण साजरी करत आहोत. त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आचरण करणे, आजही काळाची गरज आहे, याकडेही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून लक्ष वेधले.
२०१४ हे वर्ष भारतासाठी विशेष राहिले, असे सांगत राष्ट्रपती म्हणाले, ३० वर्षानंतर देशातील जनतेने एक पूर्ण बहुमत असलेले सरकार निवडले आहे. जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करणे हे आता या निवडलेल्या सरकारचे दायित्व आहे.
‘धर्म ऐक्याची शक्ती आहे़ आपण याला संघर्षाचे कारण बनू देऊ शकत नाही’, या महात्मा गांधी यांच्या वचनाचे स्मरण करून देत, देशातील विविध धर्मसमुदायातील परस्पर सहकार्य आणि सद्भावनेवर राष्ट्रपतींनी यावेळी भर दिला़ ते म्हणाले की, लोकशाहीने बहाल केलेले स्वातंत्र्य कधीकधी उन्माद निर्माण करते़ हा उन्माद आपल्या पारंपरिक प्रकृतिविरुद्ध आहे़ शब्दांचा हिंसाचार दु:ख, वेदना देऊन लोकांच्या भावना दुखावते़ गांधीजी म्हणायचे, धर्म ऐक्याची शक्ती आहे़ ते संघर्षाचे कारण बनता कामा नये़ भारताने कायम सर्वधर्मसमभावावर विश्वास ठेवला आहे़ हा सर्वधर्मसमभाव हीच भारताची खरी ओळख आहे़भारतीय राज्यघटना लोकशाहीचे पवित्र पुस्तक आहे़ भारताच्या राज्यघटनेने सर्वधर्मसमभाव शिकवला़ विविध धर्मसमुदायातील सहशनशीलता, सद्भावना वाढवली़ आता या मूल्यांची अधिक सावधगिरीने जपणूक करण्याची गरज आहे़

देशात धर्मांतराच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना आणि काही हिंदुत्ववादी संघटना व पक्षांकडून महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसे याचे महिमा पठण सुरू असताना, राष्ट्रपतींनी सर्वधर्मसमभावावर भाष्य करणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे़

दहशतवादाच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रपतींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्ताला लक्ष्य केले़ भारत आपल्या शत्रूंबाबत गाफिल राहण्याचा धोका पत्करू शकत नाही़ शांती, अहिंसा आणि एक उत्तम शेजारी देश भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्त्वे आहेत़ पण भारताच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकणाऱ्या शत्रूंपासून भारत गाफिल राहू शकत नाही़ भारत आणि भारताच्या जनतेविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या शत्रूंना नामोहरम करण्याची सर्व शक्ती आमच्याकडे आहे, असे राष्ट्रपती म्हणाले़