गडचिरोली,दि.04ः पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या ५0 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना लोकसेवेसाठी ‘जेआरडी टाटा अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार २८ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे एका बहारदार कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी दोघांना पुरस्कृत केले.
पुरस्कार सोहळ्याचे निमित्त सांगताना रतन टाटा म्हणाले, पॉप्युलेशन फाउंडेशनला ५0 वर्ष पूर्ण झाली आहे. आज भारतातील युवांची संख्या जवळपास ३७ कोटीच्याही वर आहे. देशाचे भविष्य युवा पिढीच्या हाती आहे. देशाच्या प्रगतीसाठी तरूणांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठी युवांची सक्षम पिढी निर्माण होणे आवश्यक आहे. आजचे सन्मानमूर्ती असलेले डॉ. बंग दाम्पत्य आरोग्यासोबतच सामाजिक भान असलेली युवा पिढी तयार करण्याचे काम अनेक वर्षांपासून करीत आहे. लोकसेवेसाठी प्रथमच दिला जाणारा जेआरडी टाटा सन्मान या दोघांना देताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अभय बंग म्हणाले, देशाचे आरोग्य आज वेगळ्या वळणावर आहे. जीवनमान झपाट्याने बदलत आहे. यामध्ये तग धरण्यासाठी लोकांचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यासाठी गांधींनी सांगितलेली ‘आरोग्य स्वराज’ ही संकल्पना नव्याने समजून घेणे आवश्यक आहे. ‘स्वत: मध्ये स्थित असलेला स्वस्थ’ अशी भारतीय आरोग्याची व्याख्या सांगताना लोकांचे आरोग्य लोकांच्या हाती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विचारांची शिकवण देणारे गांधी आणि या विचारकृतीला सामावून घेणारी गडचिरोलीची माणसे ही माझ्यासाठी दोन विद्यापीठ आहे. त्यामुळे हा पुरस्कार गडचिरोलीच्या लोकांना सर्मपित असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दिल्लीतील हिंसाचारात जीव गमावलेल्यांना र्शद्धांजली अर्पण करीत डॉ. राणी बंग म्हणाल्या, गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागात लोकांना अशाच दु:खाला सामोरे जावे लागते. त्यांचे दु:ख आम्ही आरोग्यसेवेच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याची भावना त्यांनी व्यक्त करीत हा पुरस्कार गडचिरोलीच्या लोकांना व कार्यकर्त्यांना सर्मपित केला. युवांना चांगले आरोग्य आणि त्यासाठी योगी संसाधने पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची भावना पॉप्युलेशन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक पूनम मुट्रेजा यांनी याप्रसंगी व्यक्त केली.