भंडारा,दि.25ः- जिल्ह्याचे ठिकाण आणि जुने शहर असूनही भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना अजूनपर्यंत झालेली नाही. कोरोना संकटाच्या निमित्ताने वैद्यकीय महाविद्यालयाची उणीव आज प्रकर्षाने जाणवत आहे. रुग्णांना योग्य प्रकारचे उपचार मिळत नसल्याने परिस्थिती बिकट आहे. भविष्यात संकटाच्या काळात आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती केली जावी, अशी मागणी भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी सभागृहात केली.
प्रश्नोत्तराच्या तासात खासदार मेंढे यांनी भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकाच्या जीवनात असा आरोग्याचा विषय लावून धरला. भंडारा जिल्हा हा जुना आहे. भंडारा हे जिल्ह्याचे शहर असतानाही येथे आरोग्याच्या दृष्टीने परिपूर्ण अशी व्यवस्था नाही. सध्या कोरोनाच्या संकट काळात वैद्यकीय महाविद्यालयाची गरज आज प्रकर्षाने जाणवत आहे. येथील रुग्णांना उपचारासाठी नागपूर किंवा अन्य शहरांकडे अडचणीच्या वेळी धाव घ्यावी लागत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असणे अत्यंत गरजेचे आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली व्यवस्था आज शहरात आहे. १000 खाटांची व्यवस्था असलेली वास्तू भंडारा येथे तयार आहे. अशावेळी भंडारा जिल्ह्यात वैद्यकिय महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे सभागृहात केली आहे.