25 लाखांची मदत, दुर्घटनेस दोषी डॉक्टराला निलंबित करा-मनसे नेते बाळा नांदगावकर

0
61

नागपूर, –भंडारा रुग्णालयातील दुर्घटनेस प्रशासन जबाबदार आहे. राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली. परंतु, अशा समितीचा अहवाल पुढे येत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. याप्रकरणी रुग्णालयाचे डॉ. प्रमोद खंडाते यांना निलंबित करून या घटनेची चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविली. या घटनेतील मृतकांच्या कुटुंबीयांना आपले कुटुंब समजून न्याय द्यावा, मृतकांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत द्यावी, कुटुंबातील एका सदस्यांना सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणीही मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.पत्रपरिषदेला मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, दिलीप रामेडवार, सतीश कोल्हे, किशोर सरायकर, अजय ढोके, विशाल बडगे उपस्थित होते.

भंडारा जिल्हा रुग्णालयात दुर्घटना घडल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी आज रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भंडारा येथील घटना हदयद्रावक आणि काळीज पिळून काढणारी आहे. वेदना शब्दात व्यक्त करू शकत नाही. या दुर्घटनेत प्रशासनाचा गलथानपणा दिसून येतो. तीन वर्षात रुग्णालयाचे फायर ऑडिटच झालेले नाही. या घटनेकडे बघताना सरकारने डोळसपणे बघावे. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल घटनास्थळी जाऊन आले. मध्यंतरी मुंबई पुल कोसळून काहींचे जीव गेले. तेव्हा सरकारने सर्व पुलांचे ऑडिट करण्याचे निर्देश काढले. दुर्घटना घडल्यानंतर सरकारला जाग येते.महाविकास आघाडी सरकारने मंत्र्यांच्या बंगल्याची डागडूजी, वाहने, फर्निचर खरेदीवर कोट्यवधींची उधळपट्टी केली आहे. मात्र, या दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबियांना तोकडी मदत केली. गरीबांना मदत करताना सरकारचा नेहमी आखडता हात असतो, असा आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला.

परंतु, घटना घडण्यापूर्वी असे आदेश का काढले जात नाही? याकडे त्यांनी लक्ष वेधले. पिडितांना लाख रुपये दिले की, आपली जबाबदारी संपली असे सरकारचे धोरण दिसून येते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. मात्र,पाच दिवस उलटूनही एकही गुन्हा दाखल नाही.
धनंजय मुंडेंची पाठराखण
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडें यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मुंडे यांनीच स्वत: मागणी केली आहे. त्यामुळे चौकशी व्हायला हवी. घरच्या संमतीने त्यांनी दुसरे लग्न केले तर त्यात काहीही गैर नाही. अनेक नेत्यांनी यापूर्वी असे केलेले असल्याचे सांगून नांदगावकर यांनी मुंडे यांची पाठराखण केली.