
पंढरपूर-राष्ट्रवादीचे नेते आणि पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने यापूर्वीच आपला उमेदवार जाहीर केला होता. पण, आज अखेर राष्ट्रवादीनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली.
भारत भालके यांचे काही महिन्यापूर्वीच कोरोनामुळे निधन झाले. यानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी कुणाला संधी मिळणार याकडे सर्व राज्याचे लक्ष्य लागून होते. भाजपने यापूर्वीच समाधान महादेव आवताडे यांना आपला अधिकृत उमेदवार जाहीर केले आहे. यानंतर राष्ट्रवादीनेही भारत भालके यांच्या मुलाला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे.
जयंत पाटील यांचे ट्विट
आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा ! , असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.