
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात यंदा ६५ हजार हेक्टर शेतीतून जवळपास ३५ लाख क्विंटल धानाचे उत्पन्न झाले आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यातील गोदामांची धान साठवण क्षमता मात्र ४ ते ५ लाख क्विंटलचीच असल्याने धान खरेदी केलेले धान ठेवायचे कुठे हा प्रश्न समोर आहे. त्याच सोबत अद्याप संपूर्ण धान खरेदी केंद्र सुरु झालेले नाही यामुळे सुद्धा शेतकरी बांधवाना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होईल आणि शेतीची कामे करायला बळीराजा शेतात जाईल मात्र घरात असलेले धान विकले गेले नाही तर नवीन धान पिकवून ठेवायचे कुठे? सोबतच कर्जाचे हफ्ते कुठून फेडायचे असा प्रश्न शेतकरी बांधवाना पडला आहे. सोबतच विमा कंपनी देखील योग्य तसा प्रतिसाद शेतकरी बांधवाना देत नाही. अशा विविध समस्यांना घेऊन आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेतली आणि शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडल्या. आणि रबी हंगामातील धान खरेदी लवकरात लवकर करण्याची विनंती केली. ज्यावर लवकरच तोडगा निघेल असा आशावाद आमदार विनोद अग्रवाल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर व्यक्त केला.
दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना धानावर बोनस देण्याची परंपरा आहे. मात्र यंदा शेतकरी बांधवांच्या खात्यात बोनसची रक्कम जामच झाली नाही. धानाचे चुकारे देखील शेतकरी बांधवांना उशिरा मिळाले. मात्र आता शेतकरी वर्ग नाराज झाला असून त्यांच्या आक्रोश फुटण्याचा आधी धानाच्या बोनस ची रक्कम त्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करा अशी विनंती आमदार विनोद अग्रवाल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना केली आहे.