तिरोडा, दि.11 : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयातील कार्यालय प्रमुख महिलेने तहसील कार्यालयातील लिपिकाला जातीवाचक शिवीगाळ दिल्याचे सांगून या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. मात्र प्रकरण अशाप्रकारे घडले नसून या प्रकरणाला वेगळेच रंगरूप देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सदर महिलेने जातीवाचक शिवीगाळ केली नसतानाही तिला या गुन्ह्यात अडकविण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जात आहे. हा एक राजकीय षडयंत्र सुद्धा असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रविकांत (गुड्डू) बोपचे यांनी रविवार, 10 ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
याप्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तूरकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य कैलाश पटले व इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रपरिषदेत माहिती देताना रविकांत बोपचे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे मला 2019 मध्ये तिरोडा-गोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यात माझा पराभव झाला. परंतु, जनतेने मला मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. त्यामुळे, पराभव होवूनही जनसेवेचे कार्य सातत्याने सुरू ठेवण्यासाठी सर्वसामान्य जनतेला सोयिस्कर होईल अशा ठिकाणी कार्यालयाची स्थापना केली. या कार्यालयातून जनसेवेचे कार्य करण्याची कामे सुरू करण्यात आली. आज या जनसंपर्क कार्यालयाला दोन वर्षे पूर्ण झाली. यात फक्त राजकीय चर्चा व राजकीय कामे होतात. महिलांना कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी असल्यास राजकीय कार्यालयात जावून आपली तक्रार मांडण्यास संकोच होतो. त्यांना आपली व्यथा व अडचणी मोकळ्या मनाने मांडता याव्या व त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी या हेतूने कार्यालयात महिला प्रतिनिधी म्हणून सुषमा पटले यांची आम्ही नेमणूक केली. तसेच्या त्यांच्या सहकार्यासाठी सोबतीला सदानंद पटले रा. सर्रा व कार्तिक राऊत रा. लाखेगाव हे दोन कर्मचारी दिले.
पाच हजार कुटुंबांना मिळवून दिला लाभ
असे सांगून बोपचे पुढे म्हणाले की, मागील दोन वर्षात या कार्यालयात शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता समस्या घेवून आले. कार्यालयामार्फत त्यांच्या कामाचा पाठपुरावा करण्यात आला. यातून आजपर्यंत जवळपास 5 हजार कुटुंबांच्या अर्जावर कामे करून त्यांना लाभ मिळवून देण्यात आला आहे. कार्यालयात कार्यालयात दररोज किमान 50 ते 60 नागरिक आपल्या तक्रारी घेवून येतात. जनतेच्या समस्या व वाढत्या गर्दीमुळे मी पुन्हा 3 सहकार्यांची येथे नियुक्ती केली.
सर्वसामान्य जनतेचे काम ज्या कार्यालयाशी संबंधित असते त्या कार्यालयातील कर्मचारी तीच कामे करतात. पण त्यातील काही कर्मचारी त्यांच्या कामाचा संबंधित दस्तावेज पाठपुरावा समज नसणार्या शहरी किंवा ग्रामीण व्यक्तीला वेळेवर करीत नाही. कधीकधी कुठल्या शासकीय योजनेला कोणती कागदपत्रे अपेक्षित असतात याची परिपूर्ण जाणीव नसल्यामुळे त्यांचे प्रकरण प्रलंबित असतात. त्यामुळे त्या सर्वसामान्य व्यक्तीला नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यांना हा त्रास होवू नये यासाठी या जनसंपर्क कार्यालयामार्फत त्यांच्या कागदपत्रांची सहानिशा करून सगळे आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडून मागवून व्यवस्थित तयारी करून पाठपुरावा केला जातो. नियोजित वेळेत काम पूर्ण होवून लाभार्थ्याला लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न केले जाते.
शासकीय कर्मचारी घेतात लाभार्थ्यांकडून पैसा
बोपचे पुढे म्हणाले, आपण या कार्यालयामार्फत वयोवृद्धांकरिता असलेली श्रावण बाल योजना, अपंग, विधवा, निराधार अशा महिला व पुरुषांकरिता संजय गांधी निराधार योजना, कुटुंब अर्थसहाय्य योजना यासह इतर अनेक योजनांचा गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी मदत केलेली आहे. पण ज्या शासकीय कार्यालयाचा संबंध सर्वसामान्य जनतेच्या कामाशी निगडीत आहे, त्या कार्यालयातील काही कर्मचारी जाणीवपूर्वक भोळ्याभाबळ्या जनतेची दिशाभूल करतात. त्यांच्याकडून अनावश्यक पैसा घेण्याचा प्रयत्न करतात. जर कुणी देण्यास नकार दिला तर त्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवतात. यामागे त्यांना त्रास व्हावा व त्यांच्याकडून अनावश्यक पैसा घेता यावा, हा हेतु असतो. या गोरखधंद्याची कल्पना तेथील विभाग प्रमुखाला नक्कीच असावी किंवा त्याच्या छत्रछायेत असल्या कामांना प्रोत्साहन मिळतो, असा आरोपही बोपचे यांनी केला.
असे घडले प्रकरण, अॅट्रोसिटीचा गुन्हा खोटा
प्रकरणाची माहिती देताना रविकांत बोपचे म्हणाले, नेहमीप्रमाणे 7 ऑक्टोबर 2021 रोजी जनतेच्या तक्रारीची सहानिशा करण्यासाठी तिरोडा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालय प्रमुख सुषमा पटले व त्यांचे सहकारी सदानंद पटले हे भुराटोला (पालडोंगरी) येथील रेशनकार्डचे विषय घेवून विचारपूस करण्यासाठी तहसील कार्यालयात गेले. तेथे कार्यरत पुरवठा निरीक्षक जीवन राठोड यांच्याशी तक्रारीसंबंधी चर्चा केल्या. दरम्यान बाजूच्या टेबलवर बसलेले दुसरे कर्मचारी कनिष्ठ लिपिक जयद्रथ मेश्राम यांनी सुषमा पटले यांच्याशी अरेरावी केली. अभद्र भाषेचा उच्चार केला. त्यांनी ज्या भाषेचा वापर केला त्यावर तेथे उपस्थित इतर पुरुष व महिला कर्मचार्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होते. पण सर्व कर्मचारी गप्प होते. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असावा, असा संशय आहे.अशा परिस्थितीत सुषमा पटले व त्यांचे सहकारी यांनी त्यांच्याशी झालेल्या अभद्र व्यवहाराची तक्रार करण्यासाठी तिरोडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. कनिष्ठ लिपिक जे.जे. मेश्राम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.ही बाब जेव्हा कनिष्ठ लिपिक जे.जे. मेश्राम यांना कळली त्यानंतर त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी समाजबांधवांना सोबत घेवून जातीवाचक शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार केली. तेही 24 तास उलटल्यावर केली. त्यामुळे खोट्या प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला, असे बोपचे पत्रकार परिषदेत म्हणाले.