देवरी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा

0
122

संतोष तिवारी, सुमन बिसेन आणि ओमप्रकाश रामटेके पराभूत

देवरी (सुरेश भदाडे)दि.19- नुकत्याच झालेल्या देवरी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी 11 जागांवर विजय संपादन करीत नगर पंचायतीवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. कॉंग्रेस 4 तर राष्ट्रवादीला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले.

देवरीकरांचे लक्ष लागून असलेल्या निवडणुकांचा निकाल अखेर आज जाहीर झाला. राज्यात सर्वात महागडी निवडणुक म्हणून देवरी नगरपंचायतीची निवडणुक चर्चेत होती.स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आज मतमोजणी करण्यात आली या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन बिसेन यांचा पराभव झाला तर माजी नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे यांची दुसऱ्यांदा नगरपरिषदेवर वर्णी लागली आहे. याशिवाय माजी उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके पराभूत झाले असून दुसरे उपाध्यक्ष अलताफ शेख मात्र निवडून आले. पराभूत नगरसेवकांमध्ये प्रामु्ख्याने संतोष तिवारी यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून श्री तिवारी यांच्या स्नूषा  आणि राष्ट्रवादीच्या उषा तिवारी यांना सुद्धा मतदारांनी चांगलाच दणका दिला. याच प्रभागातून महिला आरक्षण असल्याने भाजपचे महामंत्री प्रवीण दहिकर यांनी त्यांच्या धर्मपत्नीसाठी पक्षाची तिकीट खेचून आणली. मात्र, पक्षांतर्गत बंडाळीने  वनिता दहिकर या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. प्रभाग क्रमांत 3 मधून भाजपच्या प्रज्ञा संगीडवार यांनी राष्ट्रवादीच्या ममता गिरी यांचा 112 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक 4 मध्ये विद्यमान नगरसेवक आणि भाजपचे उमेदवार रितेश अग्रवाल यांची दुसऱ्यांदा परिषदेवर वर्णी लागली. प्रभाग क्र.5 मधून भाजपच्या तनूजा भेलावे यांनी राष्ट्रवादीच्या पारबता चांदेवार यांचा केवळ 15 मतांनी पराभव केला. उल्लेखनीय म्हणये या प्रभागात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कॉंग्रेसच्या दिपिका बळगे यांनी 170 मते घेतली. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस याच्यांत मतांचे चांगलेच विभाजन झाल्याने भाजपला याचा लाभ झाला. प्रभाग क्र 6 मध्ये भाजपचे संजय उईके यांनी राष्ट्रवादीचे कुवरलाल चनाप यांचा पराभव केला. प्रभाग क्र.7 मधून कॉंग्रेसचे सरबजीतसिंग भाटीया यांनी भाजपचे संतोष तिवारी यांना पराभवाची धूळ चारली. प्रभाग क्र. 9 मध्ये भाजपच्या कमल मेश्राम यांनी एकतर्फा बहुमत मिळविले. त्यांना मिळालेल्या मतांच्या जवळपासही दुसरा उमेदवार फिरकू शकला नाही.प्रभाग क्र.10 मध्ये राष्ट्रवादीच्या हिना टेंभरे यांनी  भाजपच्या लता झिंगरे यांचा पराभव केला. प्रभाग क्र.11 मध्ये भाजपचे संजय दरवडे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे महेश फुन्ने यांचा पराभव केला. प्रभाग क्र.12 मध्ये भाजपच्या सीता रंगारी यांनी राष्ट्रवादीच्या कमोल खरोले यांचा 221 मतांनी पराभव केला. प्रभाग क्र.13 मधून भाजपचे कृष्णा चोपकर यांचा पराभव करून कॉंग्रेसचे मोहन डोंगरे विजयी झाले. प्रभाग क्र. 14 मध्ये कॉंग्रेसचे नितीन मेश्राम विजयी झाले. त्यांनी भाजपचे सुकचंद राऊत यांना पराभूत केले. उल्लेखनीय म्हणजे ही जागा ओबीसीचे आरक्षण रद्द केल्याने खुली करण्यात आली होती. या जागेवर सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसीचा उमेदवार देण्याची घोषणा केली होती. मात्र या जागेवर भाजपने सुकचंद राऊत यांना उमेदवारी दिल्याने त्याचा फटका भाजपला बसल्याची चर्चा शहरात आहे. प्रभाग 15 मध्ये  भाजपच्या पिंकी कटकवार यांनी शिवसेनेच्या करुणा कुर्वे यांचा पराभव केला.प्रभाग क्र.16 मध्ये भाजपच्या नूतन कोवे यांनी शिवसेनेच्या प्रिती नेताम यांचा पराभव केला. प्रभाग क्र.17 मध्ये राष्ट्रवादीचे पंकज शहारे यांनी भाजपचे विलाश शिंदे यांचा पराभव केला. या निवडणुकीत अनेक दिग्गज घरी बसल्याने राजकीय नेत्यांना देवरीकरांनी चांगलीच चपराक लावल्याची चर्चा आहे.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया अगदी शांततेत पार पडली. ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांचे नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.