काँग्रेसमध्ये खदखद!:आशिष देशमुख यांचा काँग्रेस सरचिटणीसपदाचा राजीनामा

0
59

नागपूर,दि.31ः महाराष्ट्रामधून काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यानंतर राज्यातले काँग्रेसचे नेते नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. आशिष देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षश्रेष्ठींनी बाहेरचा आणि नवखा उमेदवार लादला त्यासाठी सोनिया गांधींवर कुणाचा दबाब होता का? अशा शब्दात देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला उत्तरप्रदेशसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे का? असा सवालही देशमुख यांनी केला आहे. काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली, त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्राबाहेरील उमेदवार दिल्याने महाराष्ट्र काँग्रेसमधील खदखद समोर येत आहे. डॉ. आशिष देशमुख यांनी काँग्रेस महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. इमरान प्रतापगडी या बाहेरच्या उमेदवाराला महाराष्ट्रावर लादल्याने देशमुख नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेश करताना डॉ. आशिष देशमुख यांना राज्यसभेचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र वरिष्ठांनी हे आश्वासन पाळले नसल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला असला तरी आपण पक्ष सोडणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशातून काँग्रेसचे केवळ दोन आमदार निवडून आले. अशा राज्यातून प्रतापगडी, राजीव शुक्ला आणि प्रमोद तिवारी अशा तीन नेत्यांना राज्यसभेवर पाठवणे हे कितपत योग्य आहे असा सवालही आशिष देशमुख यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्ष श्रेष्टींच्या अशा प्रकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात मी महासचिव पदाचा राजीनामा देत आहे असे मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.

म्हणून दिला राजीनामा

“मी माझ्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. महाराष्ट्रात अतिशय कर्तबगार आणि काँग्रेसला रिझल्ट देऊ शकतात असे नेते उपलब्ध आहेत. असे असताना एका बाहेरील उत्तर प्रदेशच्या व्यक्तीला इम्रान खान उर्फ इम्रान प्रतापगडी या नवख्या व्यक्तीला महाराष्ट्रात लादण्यात आले. त्यांना काँग्रेसच्या वतीने राज्यसभेची उमदेवारी देण्यात आली. या निर्णयाच्या निषेधार्थ मी माझ्या महासचिव पदाचा राजीनामा देत आहे.” असे देशमुख म्हणाले.

पक्ष सोडणार नाही

मी राजीनामा देत असलो तरी काँग्रेसमध्ये राहणार आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातूनच जनतेची सेवा करणार आहे, असे स्पष्ट भूमिका देशमुख यांनी घेतली आहे.

कव्वाली, शायरी आणि मुशायरा शिकवले पाहिजे

“इम्रान प्रतापगडी यांचे एकच क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे ते कव्वाल आहेत, शायर आहेत आणि मुशायरे करतात. म्हणून शिर्डीतील प्रदेश काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात एक वर्कशॉपमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना कव्वाली करणे, शायरी करणे आणि मुशायरा करणे शिकवण्यात आले पाहिजे. ते शिकवण्यासाठी इम्रान प्रतापगडी महाराष्ट्रात आले तर नक्कीच आनंद होईल.” अशी खोचक टीका देखील आशिष देशमुख यांनी केली.