आमदार चंद्रिकापुरेच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली अन्नपुरवठा सचिवांची भेट

0
24

अर्जुनी-मोरगाव : खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना रबी हंगाम धान खरेदी केंद्र एकरी १६ क्विंटलची खरेदी सुरू करण्याचे आदेश द्यावे. यासाठी सोमवारला मुंबई मंत्रालय येथे अन्नपुरवठा सचिव विजय वाघमारे यांच्याशी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तसेच गोंदिया जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रांना तात्काळ उन्हाळी धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली .यावर्षीही धान खरेदीला २८ दिवसांचा विलंब झाला आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने धान विकण्यासाठी शेतकरी आतूर झाले आहेत. उन्हाळी धान खरेदीची समस्या ऐरणीवर असून, शेतकऱ्यांच्या वास्तव समस्येची ओळख करून देण्यात आली. शासन व प्रशासन स्तरावरून तत्काळ दखल घेत गोंदिया जिल्ह्यात आधारभूत केंद्राची व शासनाची सुद्धा स्वतःची गोदाम व्यवस्था स्वयंपूर्ण नाही. त्यामुळे पावसाच्या दिवसात उघड्यावर खरेदी करण्याची वेळ येते. खरीप हंगामातील धान अद्यापही आधारभूत खरेदी केंद्रात पडून आहेत. पणन कार्यालयाने भरडाईच्या डीओला गती देण्याची आवश्यकता आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रबी धान खरेदीचा ३० जून राहणार असल्याची माहिती आहे. केवळ जून महिन्यात संपूर्ण जिल्ह्याचे धान खरेदी अशक्य आहे. त्यामुळे धान खरेदीची तारीख वाढवावे, अशी मागणी करण्यात आली.

त्यातच गोदामाची समस्या, पाऊस यामुळे धान खरेदी संथ गतीने होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने धान खरेदीला गती देण्याचा प्रयत्न करावा, असे सांगण्यात आले. आधारभूत खरेदी केंद्रांना तत्काळ केंद्र सुरू करू, असे अन्नपुरवठा सचिव विजय वाघमारे यांनी आश्वासित केले.या वेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, तालुका अध्यक्ष डॉ.अविनाश काशीवार, नगरपंचायत अर्जुनी/मोर नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, किशोर तरोणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.