ईडीच्या कारवाईविरोधात गोंदियात काँग्रेसचे रास्तारोको आंदोलन,औरंगाबादसह नागपूरमध्ये कार्यकर्त्यांची धरपकड

0
34

गोंदिया- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्डप्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने केलेल्या चौकशीचा निषेध नोंदवण्यासाठी आज शुक्रवारी (17 जून) गोंदिया जिल्हा काँग्रेसच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करुन गोंदिया शहर पोलिस ठाण्यात नेले.

काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. केंद्रातील मोदी सरकार सूडबुद्धीने चौकशीच्या नावाखाली काँग्रेस व गांधी कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी हे कृत्य त्वरित थांबवावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तसेच १५ जून रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या दिल्ली येथील मुख्यालयात बेकायदेशीर घुसून काँग्रेसच्या नेत्यांना दिल्ली पोलिसांनी मारहाण केली. याचाही यावेळी निषेध नोंदवण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटी,महिला काँग्रेस, सेवादल, युवक काँग्रेसने जयस्तंभ चौकात जोरदार निदर्शने केली.

केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकात रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड,आमदार सहसराम कोरेटे, प्रदेश सचिव अमर वराडे,पी.जी.कटरे,अशोक गुप्ता, माजी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे,महिला काँगेस अध्यक्ष वंदना काळे,उषा शहारे,राधेलाल पटले,जितेंद्र कटरे,जितेश राणे,राजीव ठकरेले,जहिर अहमद,अनिल गौतम,हरिष तुळसकर,संदिप भाटिया,रमेश अंबुले,निलम हलमारे,एड.योगेश अग्रवाल, गौरव बिसने,आलोक मोहंती,परवेज बेग,राजकुमार पटले,राजु काळे,आशिप सैय्यद,निशांत राऊत,जिवनलाल शरणागत यांच्यासह हजारोच्या संख्येत कार्यकर्त सहभागी झाले होते.

औरंगाबादसह नागपूरमध्ये कार्यकर्त्यांची धरपकड

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्डप्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने केलेल्या चौकशीचा शुक्रवारीही (17 जून) राज्यभर तीव्र निषेध करण्यात आला. औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, नागपूर, अहमदनगरमध्ये काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हीशाम उस्मानी, माजी मंत्री अनिल पटेल, काँग्रेस सेवादलचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, बाबुराव पवार, अल्ताफ पटेल, डॉ. जफर खान, हेमलता पाटील, किरण पाटील – डोणगावकर, जयप्रकाश नारनवरे, इक्बाल सिंग गिल, भाऊसाहेब जगताप, संदीप बोरसे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

ठिकठिकाणी निदर्शने

मराठवाड्यात परभणी, नांदेड, बीड या ठिकाणीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यांनी राहुल गांधी आणि गांधी कुटुंबाच्या चौकशीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. नागपुरातही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार आंदोलन केले. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणी दोन दिवस चौकशी करण्यात आली. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ते रस्त्यावर उतरले आहेत.