
– निर्दोषांची सुटका व दोषींवर कारवाईची मागणी
गोंदिया, 22 जून-जिल्ह्यातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक होत आहे. यावर प्रशासकीय यंत्रणेने नियंत्रण ठेवून प्रतिबंध घालने हे संबंधित अधिकार्यांची नैतिक जबाबदारी असताना उलट अधिकारी रेती माफियांशी आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षीतपणामुळेच महालगाव येथे अपघात घडून दोन निरपराध युवकांचा नाहक बळी गेला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाने वेळीच यावर आळा घातला असता तर ही घटना घडली नसती. याचा जनक्षोभ पहायला मिळाला. आंदोलकांवर विनाकारण गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस प्रशासनाने निर्दोषांची सुटका करावी, अशी मागणी खा. सुनील मेंढे यांनी आज, 22 जून रोजी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत केली.
यावेळी तिरोडाचे आ. विजय रहांगडाले, माजी आ. रमेश कुथे, भाजपा जिल्हा महामंत्री संजय कुळकर्णी, जिप सभापती संजय टेंभरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे, जिप सदस्य पवन पटले, मनोज पटनायक, चंद्रभान तरोणे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना खा. मेंढे यांनी सांगितले की त्यांनी आज महालगाव अपघातात मृत्यू झालेल्या आगाशे यांच्या कुटुंबीयांची सांत्वना भेट घेतली. यावेळी शासनाकडून आवश्यक ती मदत व वैयक्तिक मदतीची ग्वाही दिली. यानंतर त्यांनी महालगाव, बोंडराणी/अर्जुनी येथील रेतीघाटांना भेट दिली. यावेळी त्यांनी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन होत असल्याचे प्रत्यक्ष पाहिले. घाटांवर अनेक अनियमतता अनुभवली. यात आवश्यक तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले नव्हते, भेटपुस्तिका नव्हती, मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात रेतीची साठवणूक करण्यात आल्याचेही मेंढे यांनी सांगितले. बोंडराणी घाटावर एक पोकलँड अवैधरित्या आढळल्याने त्याच्यावर वेळीच पंचनामा करुन कारवाई करण्यात आली. घाटकुरोडा घाटावर संबंधित अधिकारी उपस्थित नव्हते. या सर्व प्रकारावर आळा घालण्याची जबाबदारी पोलिस, महसूल व परिवहन विभागाची असताना या प्रकाराकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही मेंढे यांनी केला. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आश्वासन ते पूर्ण न केल्याने कुटुंबीय व नागरिकांनी आंदोलन केले. मदत न मिळाल्याने आंदोलक संतप्त झाले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात प्रतिउत्तर म्हणून आंदोलकांनी दगडफेक केली. यात सहायक पोलिस निरीक्षकासह अन्य तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान जखमी पोलिसांना मदत करुन त्यांना रुग्णालयात नेणार्यांच पोलिसांनी मुख्य आरोपी केले आहे. पोलिसांवरील हल्ल्याची घटना निंदनीय आहे. याचे कदापी समर्थन करीत नाही. मात्र निर्देषांना या प्रकरणातून सुटका करुन या प्रकरणातील दोषी असलेल्या पोलिस, महसूल व परिवहन विभागाच्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही खा. मेंढे यांनी पत्रपरिषदेत केली.