मुंबई-महाराष्ट्राचे माजी मंत्री रामदास कदम गत काही दिवसांपासून शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांचे सुपुत्र योगेश कदम, एकनाथ शिंदेंचा हात धरुन गुवाहाटीला गेल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण आता रामदास कदमांनी आपण शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले -‘मी अखेरपर्यंत शिवसेनेत राहील. पण मुलाचे काहीच सांगू शकत नाही.’ त्यांच्या या भूमिकेमुळे कदम पिता-पुत्र ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांतील आपली भूमिका चाचपडून पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेशी गद्दारी करणार नाही
रामदास कदम म्हणाले -‘मी पक्षाशी गद्दारी करणार नाही. मी आजही शिवसेनेत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहील. पण, मुलांचे सांगता येत नाही. त्यांना त्यांच्या मतदार संघांत त्रास दिला जात आहे. यात तथ्य आहे. त्यामुळे त्यांना जिथे जायचे तिथे जाऊ द्या. पण मी अखेरपर्यंत शिवसैनिक म्हणूनच शिवसेनेत राहील. मी केव्हाही भगव्याची साथ सोडणार नाही.’
रामदास कदम शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ते सेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण यांना कोकणात अनेकदा आव्हान दिले. कदम 1990 पासून सलग 4 वेळा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहून शिवसेनेने 2005 मध्ये त्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली होती.
2010 मध्ये त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली. फडणवीस सरकारमध्ये त्यांनी पर्यावरण मंत्रालयाची धुरा सांभाळली. पण, त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. त्यांना सेनेत साइडलाइन करण्यात आले.
योगेश कदम बंडखोरांना सामील
2019 च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम दापोली मतदार संघातून विधानसभेवर गेले होते. ते आता एकनाथ कदम यांच्या नेतृत्वातील सेनेच्या बंडखोर गटात सामील झालेत. त्यांनी कालच एका ट्विटद्वारे आपण कायम शिवसेनेत असल्याचा दावा केला होता. मी काल, आज व उद्या शिवसेनेतच राहील. भाजपमध्ये कोणत्याही स्थितीत प्रवेश करणार नाही. मुळात तशी गरजच भासणार नाही. राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेला संपवू नये यासाठी आम्ही उचलेले पाऊल भविष्यात सेनेले अधिक भक्कम करेल. त्यानंतर दापोली मतदार संघात पुन्हा शिवसेनेचाच फडका झळकेल, असे ते म्हणाले होते.