ऑटो ड्रायव्हर, आनंद दिघेंचे मानसपुत्र ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जाणून घ्या कोण आहेत एकनाथ शिंदे?

0
104

उभ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणाने गुरुवारी आणखी एक धक्कादायक वळण घेतले. चक्क ज्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात होते, त्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. हिंदुत्व आणि तत्वाच्या राजकारणाचा हवाला त्यांनी यावेळी दिला. ऑटो ड्रायव्हर, आनंद दिघेंचे मानसपुत्र ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. जाणून घेऊयात एकनाथ शिंदे यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल…

एकनाथ संभाजी शिंदे हे शिवसेना नेते असून, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. या आधी 2014 ते 2019 पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. 2019 च्या सुरुवातीपासून त्यांनी काही महिने आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (2009, 2014 आणि 2019) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (2004) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते1980 च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे.

आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर शिंदेंकडे राजकीय वारसा

26 ऑगस्ट 2001 रोजी आनंद दिघे यांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू अपघात नव्हे तर घात असल्याचे आजही लोक मानतात. त्यांच्या जिवन प्रवासावर नुकताच धर्मवीर नामक एक मराठी चित्रपट आला आहे. दिघे धर्मवीर नावानेही सुप्रसिद्ध होते. दिघेंच्या मृत्यूनंतर शिवसेनेला ठाणे जिल्ह्यावरील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी एक नवा चेहरा हवा होता. ठाणे हा महाराष्ट्रातील एक मोठा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडणे ठाकरे कुटुंबाला परवडणारे नव्हते. शिंदे व दिघे हे पूर्वीपासूनच एकमेकांच्या सानिध्यात असल्याने साहजिकच त्यांचा राजकीय वारसा त्यांच्याकडे आला. शिंदेंनीही हा वारसा समर्थपणे पेलून जिल्ह्यात शिवसेनेचा डेरेदार वटवृक्ष उभा केला.

या छायाचित्रात एकनाथ आपले राजकीय गुरू आनंद दिघे यांच्यासमवेत दिसत आहेत. शिंदेंनी अनेकदा दिघेंनीच आपल्याला राजकारणात आणल्याचे व महत्वाची जबाबदारी देऊन नेतेगिरी शिकवल्याचे स्पष्ट केले आहे.
या छायाचित्रात एकनाथ आपले राजकीय गुरू आनंद दिघे यांच्यासमवेत दिसत आहेत. शिंदेंनी अनेकदा दिघेंनीच आपल्याला राजकारणात आणल्याचे व महत्वाची जबाबदारी देऊन नेतेगिरी शिकवल्याचे स्पष्ट केले आहे.

जीवन परिचय

शिंदेंचा जन्म 8 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. ते महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील डोंगराळ जावळी तालुक्याचे आहेत. पण, त्यांची कर्मभूमी ठाणे राहिली. प्रारंभीच्या काळात त्यांनी ऑटो ड्रायव्हर म्हणून काम केले. शिवसेनेचे ताकदवान नेते आनंद दिघे यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. प्रथम शिवसेना शाखा प्रमुख व नंतर ठाणे महापालिकेतील नगरसेवक म्हणून ते निवडून आले. पण, मुलगा व मुलीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिघेंनीच त्यांना परत आणले. दिघेंनी 1984 मध्ये मध्ये शिंदे यांची किसन नगरच्या शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्या नंतर दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गरजवंतांना स्वस्तात धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी केलेले आंदोलन, टंचाईच्या काळात नागरिकांना पामतेल उपलब्ध करुन देणे, नागरीकांच्या समस्यांसाठी प्रशासनाच्या विरोधात अनेक आंदोलने केल्याने शिंदे जनतेचे नेते बनले.

एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासमवेत आई जगदंबेचे दर्शन घेताना. या फोटोत त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेही आहेत. ते व्यवसायाने डॉक्टर व कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत.
एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासमवेत आई जगदंबेचे दर्शन घेताना. या फोटोत त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेही आहेत. ते व्यवसायाने डॉक्टर व कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत.

सीमाप्रश्नावरुन भोगला तुरुंगवास

अनेक आक्रमक आंदोलनामुळे शिंदे यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता. एवढेच नाही तर 1986 मध्ये सीमाप्रश्नावरुन झालेल्या आंदोलनात शिंदे यांनी आक्रमक पणे भाग घेतला होता. या आंदोलनामुळे शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी शिंदे यांनी बेल्लारी तुरुंगात 40 दिवसांचा कारावास भोगला होता.

शैक्षणिक पात्रता
गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून 11वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परंतु, शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. सन 2014 ते 2019 हा पाच वर्षांचा कालावधी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी धामधुमीचा ठरला असला तरी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पुढील अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवले. त्यांनी मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बीएची परीक्षा दिली आणि 77.25 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. परिस्थितीमुळे तरुणपणी स्वतःला शिक्षण अर्धवट सोडावे लागले, तरी त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र जिद्दीने शिकवले आणि डॉक्टर केले. श्रीकांत एकनाथ शिंदे हे एमएस (ऑर्थो) असून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

एकनाथ शिंदेंचा राजकारणातील चढता क्रम

  • 1997 मध्ये ठाणे महानगर पालिकेत नगसेवक म्हणून निवड
  • 2001 मध्ये ठाणे मनपात सभागृह नेते पदी निवड
  • 2001 ते 2004 सलग तीन वर्ष ठाणे मनपात सभागृह नेतेपदी
  • 2004 मध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले
  • 2005 मध्ये ठाण्याचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती
  • 2009, 2014, 2019 मध्ये सलग विधानसभेमध्ये निवडून गेले
  • 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या सुरुवातीच्या महिनाभराच्या कार्यकाळात विरोधी पक्ष नेतेपद
  • 2014 मध्ये सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री
  • 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा कॅबिनेट मंत्री

‘मविआ’तील मंत्रिपदे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील काही महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहेत.

  • गृहमंत्री
  • नगरविकासमंत्री
  • सार्वजनिक बांधकाम मंत्री
  • वन आणि पर्यावरणमंत्री
  • पाणी पुरवठामंत्री
  • स्वच्छतामंत्री
  • मृद व जलसंधारणमंत्री
  • पर्यटनमंत्री
  • संसदीय कार्यमंत्री
  • माजी सैनिक कल्याणमंत्री
  • विधिमंडळातील कामगिरी