
नागपूर-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले व मूळचे शिवसैनिक असलेले रामटेकचे अपक्ष आ. आशिष जयस्वाल यांच्या यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अशी मागणी भाजपच्या नागपूर जिल्हा ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकरे यांनी शनिवारी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
राजेश ठाकरे म्हणाले, आ. जयस्वाल हे खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी रॉयल्टीच्या नावावर खनिज संपदेची लूट केल्याचा आरोप आहे. रेती, मुरमाची विक्री केली. शेतातून मातीमिर्शित रेती काढण्याच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी सूर नदीलगतच्या जमिनी नातेवाईक व निकटवर्तीयांच्या नावावर खरेदी केल्या. येथून रेती काढून सरकारचा १५0 कोटींचा महसूल बुडविला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खनिकर्म मंडळात ३00 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे. मात्र, जयस्वाल यांनी आपले मुख्यमंत्र्यांजवळील वजन वापरून चौकशी थांबवली. ती चौकशी पुन्हा सुरू करण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे.
आ. जयस्वाल यांनी एका कंपनीशी हातमिळवणी करून रामटेक-पारशिवनी परिसरातील शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या. पुढे यातील काही जमिनी त्यांचे बंधू अनिल जयस्वाल यांनी संबंधित कंपनीकडून खरेदी केल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. या सर्व प्रकरणाची ईडी व सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच आपण भाजपचे जबाबदार पदाधिकारी आहोत. या सरकारमध्ये डाग नसलेले मंत्री करू, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आ. जयस्वाल यांना मंत्री करू नका, अशी मागणी करणारे मेल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले.