ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार निदर्शने; महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल

0
23

नागपूर :-शिंदे – फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून सभागृहात न जाता पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत त्यामुळे तो ठराव घ्या अशी विनंती करण्यात आली होती. परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव घेतला नाही. मात्र सोमवारी तो ठराव कोणत्याही परिस्थितीत घेण्यास भाग पाडू अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना महाविकास आघाडीचे आमदार श्रद्धांजली वाहत आहे. आणि दुसरीकडे शिंदेसरकार कामकाज करत आहेत. मुळात सरकारने विधानसभा सदस्य म्हणून आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहून कामकाज थांबवायला हवे होते असे मत व्यक्त करत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान विधानभवनाच्या पायर्‍यांवर प्रती सभागृह भरवून महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपले विचार मांडले व महापुरुषांचा अपमान करणार्‍या सरकारचा निषेध केला.

‘एयू’ म्हणजे अनन्या उदास
सत्तापक्ष गैरसमज पसरवित आहे. काल एयू वरून त्यांनी गदारोळ केला. वास्तविक पाहता रिया चक्रवर्तीने स्वतः एयू म्हणजे अनन्या उदास हे स्पष्ट केले आहे. अनन्या ही माझी मैत्रिण असल्याचे तिचे म्हणणे आहे, हे आता स्पष्ट झाले आहे,’ असे अजित पवार म्हणाले.
मिंधे सरकार विरोधात घोषणा देणाऱ्या विरोधात गुन्हे- आव्हाड
काल ठाण्यात आंदोलन झाले. शिंदे सरकार, मिंधे सरकार’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणा देणाऱ्यांना आता अटक होत असल्याची माहिती आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून पोलिस आयुक्तांना तसा फोन करून दबाव टाकला जात आहे. आम्ही गांधींना मानणारे आहोत. अटकेला आम्ही घाबरत नाही. हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी बसवून सरकार ३२ वर्षीय तरुणाला किती घाबरले आहे, हे दिसून आल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सरकारचे ‘सत्तामेव जयते’- आदित्य ठाकरे
आम्ही सत्यमेव जयते हे तत्व मानणारे आहोत तर सरकार सत्तामेव जयते मानते. सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

लोकशाहीसाठी काळा दिवस: अशोक चव्हाण
जयंत पाटील यांचे निलंबन लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. कर्नाटक सरकार कुरघोडी करत असताना आपले सरकार काहीच करत नसल्याचा खेददेखील त्यांनी व्यक्त केला.