Home Top News उद्धव ठाकरेंना धक्का देणारे एकनाथ शिंदे जनतेमध्ये किती लोकप्रिय?देशातील टॉप १० मुख्यमंत्र्यांची...

उद्धव ठाकरेंना धक्का देणारे एकनाथ शिंदे जनतेमध्ये किती लोकप्रिय?देशातील टॉप १० मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर

0

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ८ व्या क्रमांकावर आहेत

मुंबई:-शिवसेनेतील ४० आमदार फोडून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना अजून जनमानसावर पक्की मांड बसवता आली नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे हे पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे फिरत आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश, राजकीय-सामाजिक कार्यक्रम आणि महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा या माध्यमातून एकनाथ शिंदे हे सतत लाईमलाईटमध्ये राहत आहेत. परंतु, तरीही एकनाथ शिंदे यांना अद्याप राज्यातील जनतेने मुख्यमंत्री म्हणून मनापासून स्वीकारले आहे की नाही, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण, नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतमध्ये घसरण झाल्याचे समोर आले आहे.

India Today-C Voter ने केलेल्या ‘मूड ऑफ नेशन’ या सर्वेक्षणात देशातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला आहे. यामध्ये देश ते राज्य पातळीवरील राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. यामध्ये देशातील टॉप १० मुख्यमंत्री कोण, यासाठी जनतेकडून कौल घेण्यात आला. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ८ व्या क्रमांकावर आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ३९ टक्के लोकांनी पसंती दिली असून ते पहिल्या क्रमांकावर आहेत. परंतु, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ २.२ टक्केच लोकांनी पसंती दिली आहे.

कोरोना साथीच्या काळात ‘मूड ऑफ नेशन’कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या टॉप १० मुख्यमंत्र्यांची यादी कायमच चर्चेचा विषय असायची. या काळात उद्धव ठाकरे हे सातत्याने लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत वरचा क्रमांक पटकावताना दिसत होते. परंतु, ‘मूड ऑफ नेशन’च्या यावेळच्या टॉप १० मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा ८ वा क्रमांक आहे. भाजपने अनेक राजकीय गणितांचा विचार करुन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. परंतु, टॉप १० मुख्यंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे हे जवळपास तळाला आहेत. त्यामुळे लोकप्रियतेच्या बाबतीत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा फिके पडत आहेत का, असा सवाल निर्माण झाला आहे.

Exit mobile version