
गोंदिया, 6 एप्रिल-देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य दिले, ज्यांच्या प्रेरणेतून हजारो क्रांतीकारक निर्माण झाले, अशा थोर स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत कोणतेही अपमानास्पद वक्त्यव्य खपवून घेतले जाणार नाही. आपल्या सर्वांना आता एकजुटीने अशा विघातक मानसिकतेला चिरडून टाकायचे आहे. सावरकर म्हणजे काय हे अटलजींच्या वाणीतून कळते, असे प्रतिपादन गोंदिया स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा समितीचे अध्यक्ष प्रा. निलेश चौबे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा समितीच्या वतीने 5 एप्रिल रोजी नवीन प्रशासकीय इमारतीसमोर आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोपीय जाहीर सभेत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भंडारा विभाग प्रचारक सुजीत कुंभारकर उपस्थित होते. मंचावर जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. रमेश कुथे, माजी आ. हेमंत पटले, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, राजू वालिया, भाजपा भंडारा-गोंदिया संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, जि प सभापती संजय टेंभरे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, बजरंग दलाचे देवेश मिश्रा, भावना कदम, मैथिली पुरोहित, सावरकरांच्या वेषभूषेतील मुन्नालाल यादव आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. ‘मी सावरकर, आम्ही सावरकर’, ‘वंदेमारतम्’, ‘भारत माता की जय’ या जयघोषासह सावरकरांचे भव्य तैलचित्र असलेला रथ, ‘मी सावकर’ लिहलेली टोपी व गमछे घातलेली तरुणाई, ठिकठिकाणी यात्रेवर होणारा पुष्पवर्षाव, देशभक्तीपर गीते, ढोलताशे यात्रेचे आकर्षण होते. जागोजागी नागरिकांनी यात्रेचे स्वागत व सावरकरांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. नेहरु चौक, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, गांधी प्रतिमा चौक, जयस्तंभ चौका मार्गे यात्रेचा समारोप नवीन प्रशासकीय इमारतीसमोर जाहीर सभेने करण्यात आला. यात्रेत हजारोंच्या संख्येत विविध संघटनेचे राष्ट्रभक्त कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.