अकोला : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीसाठी पदभरतीच्या नावावर उमेदवारांकडून खासगी कंपन्यांमार्फत शुल्क वसूल करत फंड उभा केला जात आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला. वसूल केलेल्या शुल्काचे वाटेकरी कोण? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करावा, असे आव्हान देखील त्यांनी दिले.
अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या राज्य सरकार खासगी कंपन्यांमार्फत सुशिक्षित बेरोजगारांची पदभरतीच्या नावावर आर्थिक लूट करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदमध्ये सरळ सेवा मेगा भरतीची जाहिरात देऊन सरकार बेरोजगार उमेदवारांकडून राखीव असल्यास ९००, तर खुल्या प्रवर्गाकडून एक हजार रुपये शुल्क वसूल करीत आहे. आयबीपीएस व टीसीएस या दोन्ही कंपन्यांवर घोटाळ्यांचे आरोप आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे, नियमाप्रमाणे त्या कंपन्यांना काम देऊ नये. आगामी काळात या कंपन्यांचे संचालक कोण आहेत ते उघड करू, असा इशारा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.राज्यातील एकंदर परिस्थिती बघता सरकार सरळसेवा भरतीच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी सुशिक्षित बेरोजगारांकडून खासगी कंपन्यांमार्फत वसुल करून आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकी साठी निधी जमा करीत आहे की काय? असा संभ्रम निर्माण झाला. केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षांसाठी नाममात्र शुल्क असतांना राज्य सरकार इतर परीक्षांसाठी अवास्तव व अतिरेकी वसुली करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांची लूट थांबवून राखीवसाठी ५०, तर खुल्या प्रवर्गासाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात यावे, ते शुल्क लोकसेवा आयोगाच्या खाती जमा करण्यात यावे, अन्यथा वंचित युवा आघाडी महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभे करेल.पदभरतीसाठी आयबीपीएस आणि टीसीएस या दोन कंपन्यांची नियुक्ती राज्य मंत्रिमंडळानेच केली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळच चोरी करीत असल्याचे दिसून येते असा गंभीर आरोप देखील ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.